जळगावात जिल्हापेठ पोलिसांची मोठी कारवाई! ११ चोरीच्या मोटारसायकलींसह ३ सराईत चोरटे गजाआड

जुलै 17, 2026 5:01 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी जिल्हापेठ पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. तीन स्वतंत्र कारवायांमध्ये पोलिसांनी ११ चोरीच्या मोटारसायकली जप्त करत तीन आरोपींना अटक केली असून, सुमारे ४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरासह जिल्ह्यातील अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

mdc

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांची गंभीर दखल घेत सर्व पोलीस ठाण्यांना विशेष तपास मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करून तपासाला वेग देण्यात आला.

जळगाव सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गोपनीय माहिती मिळवली.

या माहितीवरून पोलिसांनी जियाउलहक अब्दुलहक शेख (वय ३४, रा. आझादनगर, अडावद, ता. चोपडा) याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. या गाड्या त्याने जिल्हापेठ, पारोळा, शिरपूर, चोपडा, यावल आणि थेट मध्य प्रदेश राज्यातून चोरी केल्याचे उघड झाले आहे.

यानंतर दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासात उमेश प्रदीप पाटील (रा. पिंगळवाडी, ता. अमळनेर) याला ताब्यात घेण्यात आले. त्यानेही अनेक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून तीन मोटारसायकली, सुमारे १.७५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पदरीत्या फिरणारा कैलास वसंतदास मथुरे (रा. जुनोने, ता. जामनेर) याच्याकडून एक चोरीची हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकल जप्त करण्यात आली. संबंधित वाहन औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून आरोपीला पुढील कारवाईसाठी सोयगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने पार पाडली. या कारवाईत सफौ संजय दोरकर, पोलीस हवालदार महेश महाजन, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, जितेंद्र सुरवाडे, राजेश पदमर, संतोष सोनवणे, तेजस मराठे, अमित मराठे, प्रशांत सैंदाणे, प्रवीण जाधव, अजय सपकाळे, कमलाकर बडगुजर, नरेंद्र दिवेकर, संजय लाटे, अजय आहिरे या पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now