जळगाव लाईव्ह न्यूज । ७ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूका होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. यातच नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जळगाव जिल्हा दौऱ्यावेळी याबाबत त्याच्याशी बातचीत स्थानिक नेत्यांनी केली. यावेळी जिल्ह्यात महाविकास आघाडी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते उत्सुक असल्याचे समजले. याच बरोबर शिवसेना देखील महाविकास आघाडी करायला तयार झाली आहे. मात्र याबाबत निर्णय किंबहुना अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. (mahavikas aghadi jalgaon zp)
जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाची सुरुवातीपासूनच सत्ता आहे. अशावेळी यांना दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणे गरजेचे आहे. मात्र महाविकास आघाडी सत्ते बाहेर गेल्यापासून शिवसेनेतही दुफळी निर्माण झाली आहे. शिंदे गटाची शिवसेना आणि उद्धव ठाकरे गटाची शिवसेना अशा दोन शिवसेना एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांची शिवसेना हि काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या सोबत आहे. तर शिंदे गटाची शिवसेना ही भाजपा सोबत आहे. अशावेळी शिंदे गट आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जिल्ह्यात महाविकास आघाडी व्हावी याबाबत शिवसेना उत्सुक आहे असे म्हटले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यकाळ संपला तेव्हा जळगाव जिल्हा परिषदेवर एकूण ६७ जागा होत्या. यामध्ये ३० भाजपाकडे, १६ राष्ट्रवादीकडे, १४ शिवसेनेकडे तर ४ या काँग्रेसकडे होत्या. त्यानंतर काँग्रेसचे दोन सदस्य भाजपाने आपल्याकडे वळवले आणि आपली सत्ता बसवली. गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व आहे.मात्र ते आता मोडून पाडण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्र येऊ शकते असे म्हटले जात आहे.
याबाबत शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी माहिती दिली की, शिवसेना हा पक्ष जळगाव जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये एक मजबूत पक्ष आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये शिवसेनेचे स्वतःचे उमेदवार आहेत. शिवसेना संपूर्ण निवडणूक एकटी लढू शकते इतकी शिवसेनेची ताकद आहे. मात्र ज्या प्रकारे राज्यात महाविकास आघाडीचा पॅटर्न आहे. त्याच प्रकारचा पॅटर्न जिल्ह्यात व्हावा अशी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. याबाबत वरिष्ठांची चर्चा करून म्हणजेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी चर्चा करून पुढचा निर्णय घेण्यात येईल. याचबरोबर विष्णू भंगाळे असेही म्हणाले की शिवसेनेत कुठलेही खिंडार पडलेले नाही. शिवसेना आजही एकजूट आहे. शिवसेना पक्ष संपूर्ण जिल्ह्यात ताकदवान आहे
.