जळगावात पुन्हा लाचखोरीचा पर्दाफाश! उपनिबंधकास लाचेच्या दीड लाखांसह रंगेहात पकडले

मे 20, 2026 5:11 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असून आणखी एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. सहकारी संस्थेच्या चौकशी प्रकरणात अनुकूल अहवाल पाठविण्यासाठी तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या जळगाव येथील जिल्हा उपनिबंधकासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहात अटक केली आहे. तडजोडीअंती ३ लाख रुपये निश्चित झाले होते, ज्यापैकी पहिला हप्ता म्हणून १ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने मोठी खळबळ उडालीय.

lach

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील सहकारी संस्थांचे उपनिबंधक जगदीश बाबूराव बारी (वय ५३, वर्ग-१ अधिकारी) यांच्याकडे तक्रारदाराविरुद्ध सुरू असलेल्या अवैध सावकारी चौकशी प्रकरणाची सुनावणी सुरू होती. तक्रारदार व त्यांच्या पत्नीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ नये, तसेच चौकशीचा अहवाल त्यांच्या बाजूने पाठविण्यासाठी उपनिबंधक जगदीश बारी याने ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने १८ मे रोजी थेट जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार नोंदवली. ‘एसीबी’च्या पथकाने १८ आणि १९ मे रोजी केलेल्या पडताळणीत, उपनिबंधक बारी याने लाच मागितल्याची पुष्टी झाली. अखेर तडजोडीनंतर लाचेची रक्कम ३ लाख रुपये ठरली आणि त्यातील पहिला हप्ता १ लाख ५० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले.

आज, २० मे रोजी जळगाव ‘एसीबी’च्या पथकाने उपनिबंधक कार्यालयात सापळा रचला. ठरल्याप्रमाणे, खासगी व्यक्ती देविदास धनसिंग पाटील (वय ४८, रा. जळगाव) याने उपनिबंधक जगदीश बारी यांच्या सांगण्यावरून तक्रारदाराकडून १ लाख ५० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. पैसे स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने देविदास पाटील आणि उपनिबंधक जगदीश बारी या दोघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.

दोन्ही संशयित आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जळगाव शहर पोलीस ठाण्यात सुरू आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वीच जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्याला ५ लाखांची लाच घेतला अटक करण्यात आली होती. यानंतर आता वर्ग-१ चा मोठा अधिकारी ‘एसीबी’च्या जाळ्यात अडकल्याने जळगावात मोठी खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now