⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

उपमहापौर कुलभूषण पाटलांनी केली प्रभाग १० मधील नागरिकांच्या समस्यांची पाहणी

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मे २०२१ । जळगाव मनपा, शहराच्या विस्तारित भागात नागरी मूलभूत सुविधांची वानवा असून मनपा प्रभाग १० मधील पिंप्राळा परिसरातील नामदेवनगर भागात मनपा उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी पाहणी केली. यावेळी परिसरातील रस्त्यांसह सांडपाण्याच्या गटारींची पाहणी करत नागरिकांच्या समस्या जाणून घेत, प्रभागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नागरिकांना आश्वासन दिले.

पिंप्राळा परिसरात नव्याने बांधकाम होत असून या परिसरात रस्ते, वीज, पाणी यासह सांडपाण्याच्या गटारींच्या मुलभूत सुविधांची पूर्तता करण्याचे दरवेळी आश्वासन दिले जाते. परंतु दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांत या नवीन वसाहती भागात रस्त्यांची समस्या गंभीर रूप धारण करीत असते. सर्वत्र चिखल होत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतो. रस्त्यांचे खडीकरण नसल्याने बहूतांश ठिकाणी दुचाकी वाहने चिखलात अडकून पडलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे त्याठिकाणी वाहने सोडून द्यावी लागतात.

गटारातील सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीमुळे डेंग्यू, हिवताप मलेरिया वा अन्य साथीच्या आजारांना सामोरे जावे लागत असते. इतर वेळी देखील सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे गटारातील पाणी ओसंडून रस्त्यांवर इतरत्र पसरुन चिखल होत आहे. या परिसरातील नागरिकांना दरवर्षी रस्ते गटारांची समस्यांचे निराकरण करण्यासाठी केवळ आश्वासने देण्यात आलेली असल्याचे नागरिकांनी सांगितले.

या समस्यांचे निरसन करण्यासाठी येथील परिसरातील उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आज पाहणी केली. यावेळी शहरातील रस्ते विकास कामांसाठी मनपा सभेत ७० कोटींचा निधी मंजूरीसह ठरावास मान्यता देखील देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान गटारी साठीही निधी मंजूर होऊन रस्ते व गटारींच्या कामाला चालना देण्यात आली असून लवकरच ही कामे पूर्ण करण्यात येतील, असे उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आश्वासन दिले.

यावेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासमवेत मनपा अधिकारी, बांधकाम अभियंता आदी उपस्थित होते.