⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | गुन्हे | Exclusive : पोलिसांशी ‘सेटलमेंट’ करायला ओरिसाहून विमानाने पोहचला ‘गांजा’ सप्लायर!

Exclusive : पोलिसांशी ‘सेटलमेंट’ करायला ओरिसाहून विमानाने पोहचला ‘गांजा’ सप्लायर!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे चार दिवसापूर्वी एलसीबीच्या पथकाने सापळा रचून तब्बल ५०० किलो कोरडा गांजा पकडला होता. गांजा पुरवठा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला मात्र युक्तीने मुख्य पुरवठादारच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या. गांजा घेऊन जाणारा ट्रक मालक झोडगे ता.मालेगाव येथील असल्याने त्याला ताब्यात घेत पोलिसांनी डाव आखला. पोलिसांचा डाव यशस्वी ठरला आणि सेटलमेंटच्या बहाण्याने मुख्य पुरवठादार चक्क विमानाने तात्काळ हजर झाला. पोलिसांनी लागलीच त्याच्या मुसक्या आवळल्या.

जळगाव जिल्हा एलसीबीचे पथक गस्तीवर असताना दि.१० फेब्रुवारी रोजी भुसावळजवळ त्यांनी ट्रक क्रमांक एमएच.१५.एएच.६९९४ हा संशयास्पदरित्या उभा असताना जप्त केला होता. एलसीबीचे निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी खात्री केल्यावर ट्रकमध्ये सुमारे ७५ लाखांचा ५०० किलो गांजा मिळून आला होता. पथकाने शिताफीने ट्रक चालक प्रकाश सुनील कासोटे रा.झोडगे ता.मालेगाव याला अटक केली होती. जळगाव जिल्ह्यातील गेल्या वर्षभरात गांजाची ही तिसरी मोठी कारवाई आहे.

एलसीबीच्या पथकाने चालकाला ताब्यात घेतल्यावर झोडगे येथूनच गांजाचा मुख्य पुरवठादार सीबाराम दया बसवाल रा.फासीगुडा, ता.गुंजम, जि.ओरिसा याचा पत्ता लावला. मुख्य म्होरक्याला पकडण्यासाठी पोलिसांनी डाव आखला. चालकाच्या मोबाईलवरून त्याला संपर्क साधायला सांगितला. पोलीस सेटलमेंट करायला तयार असून त्यासाठी तात्काळ यावे लागेल असे चालक प्रकाश याने सिबारामला सांगितले. आपली सुटका होईल या हेतूने सीबाराम थेट विमानाने ओरिसाहून मुंबईत पोहचला. येथून तात्काळ रेल्वेने मनमाड गाठले आणि मालेगाव पोहचला. आपला डाव यशस्वी ठरताच एलसीबीच्या पथकाने सीबारामच्या मुसक्या आवळल्या.

ट्रक चालक आणि गांजा पुरवठादार या दोघांना ताब्यात घेतल्यावर पथकाने ट्रक मालक सतिष लक्ष्मण वाघ रा.आडगाव जि.नाशिक याचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी शिकारीला अडकविण्यासाठी रचलेला डाव पद्धतशीररित्या यशस्वी ठरला असून शिकारी स्वतःच पोलिसांचा शिकार झाला आहे. गांजा मागविणारा संशयीत मालेगाव येथील असून त्याचे नाव निष्पन्न झाले आहे. एलसीबीचे एक पथक संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले असून लवकरच त्याच्या देखील मुसक्या आवळल्या जातील. पोलिसांच्या अटकेत असलेले ट्रक मालक सतिष लक्ष्मण वाघ रा.आडगाव जि.नाशिक, मुख्य पुरवठादार सीबाराम दया बसवाल रा.फासीगुडा, ता.गुंजम, जि.ओरिसा व ट्रक चालक प्रकाश सुनील कासोटे रा.झोडगे ता.मालेगाव या तिघांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता दि.१६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास एलसीबीचे उपनिरीक्षक गणेश चोभे करीत आहेत.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.