जळगाव लाईव्ह न्यूज । २८ नोव्हेंबर २०२४ । सध्या जळगावसह राज्यात थंडीची लाट आली आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातून आर्द्रता आणखी कमी होणार असून त्यात पुढील २४ तासांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात आज गुरुवारपासून तीन दिवस पारा ९ अंशांवर घसरण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ तयार झाल्यावर त्याच्या प्रभावाखाली वातावरणातील वाऱ्याच्या गतीत आणि दिशेत मोठे बदल झाले. हे चक्रीवादळ उत्तर भारतातील थंड वाऱ्यांना वेगाने दक्षिणेकडे ढकलत आहे. त्यामुळे जळगावसह उत्तर महाराष्ट्रात तसेच दक्षिण भागातही थंडी वाढत आहे.
हवामान विभागाने राज्यात पुढील दोन तीन दिवस थंडीचा जोर कायम असणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यंदा थंडीचे वातावरण लवकर तयार झाले आहे. यामुळे पहाटे बाहेर काम करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे.
थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. जळगाव शहरात उबदार कपडे विक्रीसाठी दुकाने सजली असून यावर्षी उबदार कपड्यांच्या किमतींमध्ये १० ते १५% पेक्षा अधिक वाढ झाल्याने महागाईचा फटका सर्वसामान्यांना बसताना दिसत आहे, तर दुसरीकडे ग्रामीण भागात थंडीपासून बचावासाठी शेकोट्याचा आधार घेतला जात आहे.