जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२६ । जळगाव शहरासह जिल्यात मागच्या काही दिवसापासून वातावरणातील चढ उतारामुळे थंडी गायब झाली आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ झाल्यानं दिवसा उकाडा जाणवत असून रात्री आणि पहाटे काहीशी थंडी जाणवत आहे. दरम्यान जळगावात आगामी दोन दिवस तापमानात वाढ दिसून येईल. मात्र २७ तारखेपासून पुन्हा गारठा वाढण्याचा अंदाज आहे.

सध्या उत्तरेकडील भागात थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र राज्यात सध्या ढगाळ वातावरणामुळे तापमानात चढ उतार सुरु आहे. शनिवारी जळगावचे किमान तापमान १२.५ अंश तर कमाल तापमान २८.४ इतके होते. काल दिवसाच्या तापमानात घसरण दिसून आली. शुक्रवारी दिवसाचे तापमान ३० अंशाच्या वर होते.

वातावरणातील चढ उतारामुळे जळगावातील थंडीची तीव्रता कमी झाली आहे. बंगालच्या उपसागरातून हवेत मोठ्या प्रमाणावर ओलावा येतो आहे. या ओलाव्याने ढग तयार होत असून ते जमिनीवरील उष्णता अडवून धरतात. परिणामी, किमान तापमान वाढल्याने रात्रीचा गारठा कमी होऊन उकाडा जाणवत आहे. दरम्यान, आगामी दोन दिवस तापमानात पुन्हा वाढ होईल. मात्र, २७ तारखेपासून पुन्हा गारठा वाढण्याचा अंदाज आहे.







