जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाच्या तपासात जळगाव पोलिसांना अत्यंत मोठे यश आले आहे. या गुन्ह्याला आता ड्रग्ज रॅकेटची काळी किनार असल्याचे समोर आले असून, स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने या प्रकरणातील मुख्य ड्रग्ज पुरवठादाराला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीकडून सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ (मेफेड्रोन) हे हायप्रोफाइल ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या धडक कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांनी आधीच रईस हरून सेफुद्दीन शेख, शौफिक सय्यद आरिफ आणि गुलाम अकबर शेख रईस पटेल या तिघांना अटक केली होती. न्यायालयाने या आरोपींना पोलीस कोठडी सुनावल्यानंतर, पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. या चौकशी दरम्यान आरोपींनी त्यांना ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या मुख्य म्होरक्याचे नाव ओकले.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित ड्रग्ज पुरवठादारावर पाळत ठेवली आणि सापळा रचून त्याला रंगेहात अटक केली. आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या एमडी ड्रग्जची किंमत सुमारे ६ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. या ड्रग्जची विक्री नेमकी कुठे आणि कोणामार्फत केली जात होती, याचा तपासही आता सुरू आहे.
अत्याचार प्रकरण आणि शहरात सक्रिय असलेले ड्रग्ज नेटवर्क यांचे थेट कनेक्शन उघड झाल्याने पोलिसांनी हा गुन्हा अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी तीन स्वतंत्र पथके तयार केली असून, ड्रग्ज पुरवठा साखळीतील इतर आरोपी आणि रॅकेटशी संबंधित व्यक्तींचा शोध सुरू आहे. दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, येत्या काळात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.











