जळगावात चोरट्यांचा हैदोस: एकाच रात्री ३ घरे फोडली; रोकडसह सोन्या-चांदीवर डल्ला..

मे 13, 2026 11:19 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात चोरट्यांचा धुमाकूळ काही सुरु असून सातत्याने घरफोडीच्या घटना समोर येत आहे. अशातच शहरालगतच्या वाघनगर परिसरातील राजे संभाजी चौकात चोरट्यांनी एकाच रात्री दोन बंद घरांचे कडीकोयंडे तोडून ५४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लांबवली, तर एका घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. एकाच रात्री झालेल्या या तीन घरफोड्यांमुळे परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

gharphodi chori jpg webp

मिळालेल्या माहितीनुसार, एका कुटुंबाने नुकतेच नवीन घरात स्थलांतर सुरू केले होते. घरातील सामान हलवण्याच्या कामामुळे रात्री कुटुंब नवीन घरात झोपले असताना चोरट्यांनी जुन्या घराचा दरवाजा फोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट फोडत त्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली. सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

याच परिसरातील आणखी एका घरातही चोरट्यांनी हात साफ करत चांदीच्या मूर्ती आणि रोकड चोरून नेल्याचे समोर आले आहे. तर तिसऱ्या घरात चोरीचा प्रयत्न झाला, मात्र तेथून कोणताही ऐवज हाती न लागल्याने चोरट्यांनी पलायन केल्याचे सांगितले जात आहे.

सलग तीन घरांवर डल्ला मारल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. विशेषतः उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेक कुटुंबे बाहेरगावी जात असल्याने बंद घरांवर चोरट्यांची नजर असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. चोरीमागे सराईत टोळीचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील तपास सुरू आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now