जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक महानगरपालिकेसह मालेगाव, धुळे, अहिल्यानगर आणि जळगाव महानगरापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी दिनांक ६ फेब्रुवारी, २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तर मालेगाव महापालिका महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संबंधित महापालिकेच्या सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत.

महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी विशेष बैठकीचे पीठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त किंवा त्यांचा प्रतिनिधी असेल, अशी तरतूद आहे. त्या अनुषंगाने संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

नवनिर्वाचित सदस्यांमधून जळगाव महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर यांच्या निवडीसाठी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जळगाव महापालिका सभागृहात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असून विभागीय आयुक्त यांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पीठासीन अधिकारी यांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९४९ मधील तरतुदींचे पालन करुन सभेचे कामकाज पार पाडावे तसेच बैठकीचे इतिवृत्त महानगरपालिकेच्या इतिवृत्त नोंदवहीत नोंदवून सविस्तर अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.







