⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

‘त्या’ निकृष्ट दर्जाच्या धान्याची चौकशी सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । डिसेंबर ते जानेवारी महिन्यात शेतकी संघाकडुन खरेदी करण्यात आलेले धान्य शासकीय गोदामात अवघ्या तीनच महिन्यात खराब होऊन सडलेल्या व कुजलेल्या अवस्थेत आढळुन आले. हे भरडधान्य पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानातुन ‘व्दारपोच’योजनेतर्गत गरीबांना वितरीत करण्याची प्रक्रीयेत असतानाच नागरीकांकडुन आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी गोदामात धाव घेत झाडाझडती घेतली. प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निकृष्ट दर्जाचे धान्य असल्याचे आढळुन आले. याप्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी वरीष्ठ पातळीवर याबाबत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी तहसीलदार श्वेता संचेती यांनीही दखल घेतल्यामुळे २४ रोजी अमळनेर येथील एसआयओ यांनी ग्रेड नुसार तपासणी केली.

पाच दुकानावर वितरीत करण्यात आलेली ज्वारी इतकी खराब व सडलेली होती की जनावरे सुद्धा खाणार नाही. एसआयओएससी बावणे यांनी तपासणीसाठी नमुने घेतले असुन आज अहवाल मिळणार आहे. भरडधान्य करतेवेळी शासनाचे बारदान पाठविले जाते.धान्याचा भरणा करुन ट्रेडमार्क लावुन तहसीलदार यांच्या निरिक्षणाखाली शासकीय गोदामात साठवले जाते.मात्र येथील प्रकारात बारदानच गायब असल्याने विविध शंका-कुशंकांना ऊत आला असुन नेमकं गौडबंगाल काय आहे ? याबाबत नि:पक्ष चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे सुज्ञ नागरीकांकडुन मागणी होत आहे.