⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

उपचारास विलंब झाल्याने जखमी बालिका दगावली

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२१ । जखमी बालिकेवर उपचार न करता जीएमसीतील प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी जामनेरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना ज्ञानाचे डोस पाजले. अखेर बालिकेला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत विलंब झाल्याने बालिकेला प्राण गमवावे लागले.

सविस्तर असे की, जामनेर-पहूर रस्त्यावरील यश कोटेक्स कंपनीतील एका मजूर कुटुंबातील दीपाली रेवसिंग फुलंकी (वय ६,) या बालिकेला अज्ञात वाहनाने गुरुवारी दुपारी धडक दिली. यात बालिकेच्या डोक्याला दुखापत झाली. असता जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी प्रथमोपचार करून बालिकेला जळगाव येथील जीएमसीत पाठवले. मात्र, त्या ठिकाणी डॉक्टरांनी प्रथम दाखल करून घेण्यास नकार दिला. म्हणून, जामनेर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल चांदा यांच्याशी संपर्क साधून संबंधित डॉक्टरांना सांगितल्यानंतर बालिकेला भरती करण्यात आले.

परंतु, जीएमसीत सर्जन, सीटी स्कॅन बंद असल्याचे सांगण्यात आले म्हणून, बालिकेस खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, बालिकेचा मृत्यू झाला. याबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद फुल पाटील यांनाही उत्तर देता आले नाही.