⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

भारताला बलशाली करणे हेच संघाचे कार्य – इंद्रेशजी कुमार

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२३ । भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि भारताला विश्व गुरू करण्यासाठी संघाची स्थापना झाली असून जागतिक शांततेसाठी वर्तमान परिस्थितीत भारताची भूमिका सर्वात महत्वाची आहे, सर्व जग भारताकडे आशेने पाहत आहे, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य इंद्रेशजी कुमार यांनी बीड येथे संघाच्या प्रथम वर्षाच्या संघ शिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी केले. भारताला बलशाली करण्यासाठी सर्व समाजाच्या सहभागीतेतून आपल्याला संघकाम करायचे आहे असेही ते म्हणाले.

दि.7 मे 2023 ते 28 मे 2023 या कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचा (मराठवाडा व खानदेश) “संघ शिक्षा वर्ग – प्रथम वर्ष” बीड येथे जालना रोड येथील गुरुकुल पब्लिक स्कूल येथे संपन्न झाला. या वर्गाच्या समारोप प्रसंगी म्हणून देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक मा.अनिलजी भालेराव, प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ. प. लक्ष्मण महाराज मेंगडे व अजय जाहीर पाटील, प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक मा. इंद्रेशजी कुमार (अ. भा. कार्यकारणी सदस्य, रा. स्व. संघ), वर्गाचे सर्वाधिकारी एड. बाबुराव अनारसे उपस्थित होते, तसेच बीड शहरात व परिसरातील विविध क्षेत्रातील प्रतिभावंत व्यक्तिमत्व आणि हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते.

समारोप प्रसंगी प्रमुख वक्ते व मार्गदर्शक इन्द्रेशजी कुमार म्हणाले, पूर्ण भारतभर संघाचे असे प्रशिक्षण वर्ग दरवर्षी होतात. देशात 75 हजार स्थानी संघाचे काम सुरू असून अन्य 40 देशातही संघाचे काम चालते. जगातील सर्वात मोठी संघटना म्हणून संघाकडे पाहिले जाते, पण ही शक्ती सर्व समाज जोडण्यासाठी, भारताला सक्षम करण्यासाठी आहे. भारताचे अस्तित्व सनातन आहे. आपण सर्व भारतीय एक आहोत, सर्वांचे मूळ एकच आहे. सर्वाधिक मुस्लिम व ख्रिश्चन हे धर्मांतरित झालेले आहेत. भारत हा जगातील सर्वात सेक्युलर देश आहे. आपल्या देशात सर्व जाती धर्माचा सन्मान होतो. विविधतेत एकता हीच आपली शक्ती आहे असे ते म्हणाले.

तसेच स्वसंरक्षणासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी या प्रशिक्षण वर्गात उत्तम प्रशिक्षण या दिले आहे. समाज सक्षम करण्यासाठी ही साधना महत्वाची असल्याचे प्रमुख पाहुणे ह.भ. प. लक्ष्मण महाराज मेंगडे यांनी म्हंटले.

या कार्यक्रम प्रसंगी 21 दिवसांमध्ये शिकलेल्या विविध कृतींचे प्रात्यक्षिक समारोपाच्या कार्यक्रमांमध्ये झाले. प्रमुख पाहुण्यांना स्वागत प्रणाम करण्यात आला व नंतर ध्वजारोहण व सांघिक गीत झाले. भगव्या ध्वजाला घोषयुक्त संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली.

या प्रशिक्षणासाठी देवगिरी प्रांतातील (मराठवाडा व खानदेश) 15 जिल्ह्यातून 162 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. या प्रशिक्षणार्थी मध्ये महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार, शिक्षक व वकील इत्यादी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. 21 दिवसाच्या प्रशिक्षण वर्गात शिक्षार्थ्यानी व्यायाम योग, योगासने, नियुद्ध, दंड प्रहार, यष्टी प्रहार, समता आदी विषयांचे प्रशिक्षण घेतले. तसेच सिड बॉलच्या माध्यमातून वृक्षारोपण, सेंद्रिय खत निर्मिती करण्याचेही प्रशिक्षण घेतले.