⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

टेन्शन वाढले ! १ मार्चनंतर देशात सार्वधिक कोरोना रुग्ण आढळले, वाचा धडकी भरवणारी आकडेवारी

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२२ । देशात मागील तीन ते साडेतीन महिन्यापासून कोरोना आटोक्यात आला होता. मात्र मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 7240 नवीन रुग्ण आढळले आहेत. या दरम्यान 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे लोकांची चिंता वाढली आहे.

त्यामुळे ही कोरोनाच्या चौथ्या लाटेची सुरुवात तर नाही ना, अशी शंका घेतली जातेय. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आता आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्यात. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही राज्यांना खबरदारी घेण्याचे आदेश जारी करण्यात आलेत.

१ मार्च नंतर सर्वाधिक प्रकरणे
देशात 1 मार्चनंतर कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहे. यासह, आतापर्यंत देशात कोविड बाधितांची एकूण संख्या 4 कोटी 31 लाख 97 हजार 522 झाली आहे. कोविडच्या नवीन संसर्गाच्या बाबतीत हा सलग दुसरा दिवस आहे, जेव्हा प्रकरणांमध्ये 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण 5 लाख 24 हजार 723 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

नवीन रुग्णांपैकी अर्ध्याहून कमी रुग्ण बरे
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 32, 498 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3591 लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे एकूण 2,701 रुग्ण आढळले. महाराष्ट्रात चार महिन्यांनंतर कोरोनाचे इतके रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी राजधानी दिल्लीत बुधवारी कोरोना विषाणूचे 564 नवीन रुग्ण आढळले, जे 15 मे नंतरचे सर्वाधिक आहे, तर एका संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, संसर्ग दर वाढून 2.84 टक्के झाला आहे. राष्ट्रीय राजधानीत कोविडची एकूण प्रकरणे 19,09,991 वर पोहोचली आहेत आणि आतापर्यंत 26,214 लोकांनी आपला जीव गमावला आहे.