जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । येथील विमानतळावरून सुरू असलेली विमान वाहतुकीची सेवा बंद करण्यात आल्याने नियमित सेवा सुरू राहण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. नशिराबाद येथील पर्यायी रस्ता तयार झाल्यानंतर धावपट्टीची लांबी वाढविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
जळगाव येथून मुंबई, अहमदाबाद हवाई सेवा सुरू होती. ती आता बंद झाल्याने जिल्हावासीयांमध्ये नाराजी आहे. त्या अनुषंगाने काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. प्राधिकरणस्तरावर धावपट्टीची लांबी वाढवण्याचा प्रस्तावदेखील विचाराधीन आहे. कुसुंबा ते नशिराबाद येथील ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता तयार झाल्यानंतर या धावपट्टीची लांबी वाढवली जाईल. मोठी विमाने या ठिकाणी वाहतूक करू शकतील. जळगाव विमानतळावरून हवाई सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यादृष्टीने प्राधिकरण स्तरावरही प्रयत्न सुरू असल्याचे देखील जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी म्हटले आहे.