बुधवार, ऑक्टोबर 4, 2023

जळगावकरांना दिलासा! जिल्ह्यातील धरणामधील पाणीसाठ्यात झाली वाढ, कोणत्या धरणात किती जलसाठा?

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२३ । जळगाव जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने चिंता वाढली होती. पावसाअभावी पिके करपू लागली होती तर धरणांमधील जलसाठा देखील कमी झाला होता. त्यामुळे पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. मात्र गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केलं. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील सर्व धरणात कालपर्यंत ४७.४४ टक्के पाणी साठा होता. आज शनिवार ५१.३७ टक्के पाणीसाठा झाला अशी माहिती प्रशासनाकडून जारी करण्यात आलीय. दरम्यान, गेल्या चोवीस तासांत ३.९३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. आगामी दोन तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यावर व धरणक्षेत्रात अशीच पावसाची कृपा असली तर या महिन्याभरात धरणे ओसंडून वाहतील.

जिल्ह्यात जून आणि ऑगस्ट महिन्यात पावसाने ओढ दिली. जुलै महिन्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणसाठ्यात वाढ झालेली नव्हती. पावसाळ्याचे तीन महिने उलटून गेले तरी यंदा जिल्ह्यातील अनेक धरणांतील जलसाठ्यात वाढ न झाल्याने चिंता अधिकच वाढली होती. जिल्ह्यात अद्यापही मोठ्या, मध्यम आणि लघु प्रकल्पामध्ये गेल्या वर्षीपेक्षा कमी जलसाठा आहे. ऑगस्टमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने काही धरणांनी तर तळ गाठला होता. यामुळे जलसंकट येण्याची स्थिती निर्माण झाली.

परंतु गेल्या दोन तीन दिवसापासून राज्यासह जिल्ह्यात पावसाने पुनरागमन केलं आहे. गुरुवारनंतर शुक्रवारी जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसानंतर जिल्ह्यातील जलसाठ्यात ३.९३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, आगामी दोन तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचे संकेत आहे. मुसळधार पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे…

मोठ्या धरणांमधील सध्या स्थितीचा जलसाठा?
हतनूर (82.35 टक्के जलसाठा शिल्लक)
गिरणा (43.81 टक्के जलसाठा शिल्लक)
वाघूर (62.06 टक्के जलसाठा शिल्लक)

मध्यम धरणांमधील सध्या स्थितीचा जलसाठा?
अभोरा (100 टक्के जलसाठा शिल्लक)
मंगरूळ (100 टक्के जलसाठा शिल्लक)
सुकी (100 टक्के जलसाठा शिल्लक)
मोर (77.05 टक्के जलसाठा शिल्लक)
तोंडापूर (58.27 टक्के जलसाठा शिल्लक)
अंजनी (62.64 टक्के जलसाठा शिल्लक)
गूळ (79.47 टक्के जलसाठा शिल्लक)
बोरी (13.99 टक्के जलसाठा शिल्लक)