जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२४ । उत्तर भारतात हिंदू धार्मियांचे पवित्र श्रावण मास सुरू होऊन १५ दिवस झाले. महाराष्ट्रातही काल दि ५ ऑगस्टपासून श्रावण महिन्यास सुरवात झाली यामुळे सुमारे दीड महिना उपवास सुरु असतो. त्याचा लाभदायक परिणाम प्रत्यक्ष केळी भावावर होताना दिसत आहे. केळीच्या बाजार भावात गत आठवड्यापेक्षा क्विंटलमागे ४०० ते ५०० रुपयाने वाढ झाली.
सोमवारी अनेक भागात कापणी करत असलेल्या शेतकऱ्यांचे दर्जानुसार १४०० ते १७०० रुपयापर्यंत भावात देण्यासाठी मालाची कापणी होत असल्याचे समोर आले आहे. यापुढे येणारे रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणोत्सवात केळीची मागणी सतत राहणार असल्याने भावांची पातळी कायम टिकून राहणार असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
बाजारात केळीला सर्वाधिक मार देणारा आंबा बाजारातून संपला आहे. केळी वगळता इतर फळांच्या तुलनेत बाजारात स्वस्त कोणतेही फळ नसल्याने केळीला मागणी वाढत आहे. रावेर परिसरात मे महिन्यापासून केळी कापणीला सुरवात झाली आहे. त्यामुळे बहुतांश माल ७५ टक्के केळी बागा कापणी होऊन संपुष्टात आल्या आहे. त्यामुळे मालाच्या आवक वर सुद्धा परिणाम झाला आहे. यामुळे बाजारात आंबा संपताच नेहमी केळीच्या भावात तेजी येत असल्याचा अनुभव काहींनी कथन केला.