⁠ 
रविवार, मे 19, 2024

‘डाक टिकटों में महात्मा’ प्रदर्शनाचे उद्घाटन, जळगावची केळी पोस्ट पाकिटाचेही प्रकाशन!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२२ । येथील महात्मा गांधी उद्यानात मंगळवार दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता जागतिक टपाल दिनाच्या औचित्याने गांधी रिसर्च फाऊंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डाक टिकटों में महात्मा’ या आकर्षक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. जळगाव जिल्ह्याची केळीच्या माध्यमातून संपूर्ण जगात ओळख निर्माण झालेली आहे. जगातील केळी उत्पादनात एकट्या जळगाव जिल्ह्याचा 3 टक्के इतका सिंहाचा वाटा आहे. केळीची महती सांगणाऱ्या पोस्टाच्या पाकिटाचे (विशेष इव्हलपचे) प्रकाशन सुद्धा या प्रदर्शनातच अशोक जैन व मान्यवरांच्याहस्ते करण्यात येत आहे.

जैन टिश्युकल्चर रोपे व उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून जळगावची केळीची ओळख पोस्टाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचेल याहून उत्तम योग तो कोणता असावा. जळगावकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. या कार्यक्रमास जळगावकर नागरिकांनी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सध्या साजरे होत आहे. या काळातच जागतिक टपाल दिनानिमित्त गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव टपाल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, ‘डाक टिकटों में महात्मा’ हे माहितीपूर्ण, रंजक प्रदर्शन भरविण्यात आलेले आहे. या कार्यक्रमास बी. व्ही.चव्हाण (अधीक्षक, टपाल विभाग, जळगाव), जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे चेअरमन तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अशोक जैन, निसर्गराजा कृषी विज्ञान केंद्र, तांदलवाडीचे शशांक पाटील, त्याच प्रमाणे जैन टिश्यू कल्चरचे वरिष्ठ अधिकारी व प्रगतीशील शेतकरी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

‘डाक टिकटों में महात्मा’
महात्मा गांधी हे जगातील सर्वात लोकप्रिय राजकारणी आणि व्यक्तीमत्वांपैकी एक गणले गेलेले आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशन व जळगाव डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजींच्या टपाल तिकिटांचे जनसामान्यांसाठी प्रदर्शन आयोजित केले आहे. बहुतेक देशांनी महात्मा गांधीजींच्या सन्मानार्थ टपाल तिकिटे जारी केली आहेत. देश-विदेशातील तिकिटे पाहिली तर गांधीजींचे संपूर्ण जीवन चरित्र पहायला मिळते. टपाल तिकिटांच्या जगात गांधीजी हे सर्वात जास्त दिसणारे भारतीय आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भारतातील सर्वाधिक टपाल तिकिटांवर गांधीजींची छबीच बघायला मिळते. टपाल तिकिटांच्या माध्यमातून गांधीजींचे जीवन दर्शन रसिकांना बघायला मिळणार आहे. जगातील जितक्या देशांनी टपाल तिकिटे काढली आहेत त्या 120 हून अधिक देशांची तिकिटे गांधी रिसर्च फाउंडेशनच्या अभिलेखागारात उपलब्ध आहेत. गांधी रिसर्च फाउंडेशनचा सध्या राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्मजयंती पंधरवडा सुरू आहे. त्यामध्ये अनेक कार्यक्रम सुरू आहेत. टपालाच्या तिकिट संग्रह करणाऱ्यांसाठी, टपाल तिकीट गोळा करणाऱ्या छंद असणाऱ्यांसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे.

‘जळगावची केळी आता पोस्टाच्या पाकिटावर!’
या तिकीट प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी जळगावची ओळख सांगणाऱ्या केळीचे चित्र व माहिती असलेल्या पोस्टाच्या पाकिटाचे प्रकाशन देखील करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्याची केळीचे आगार म्हणून जागतिक ओळख आहे. जळगावला देशाच्या केळीचे केंद्र म्हणून सर्वदूर परिचय आहे. महाराष्ट्र राज्यातील 90,000 हेक्टर केळीच्या बागांपैकी सुमारे 60 टक्के भाग जळगावमध्ये मोडतो. त्यात जैन इरिगेशनचे संस्थापक डॉ. भवरलालजी जैन यांच्या मार्गदर्शनाखाली टिश्युकल्चर क्षेत्रात महत्त्वपूर्ण संशोधन व नवनवीन प्रयोग केले आहेत. जैनचे टिश्युकल्चर आणि उच्च कृषितंत्रज्ञानाचा अवलंब करून सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या केळी येथे पिकविल्या जातात. शेतकऱ्यांच्या उत्पादनात 4 पटीहून अधिक वाढ झालेली आहे. केळी हे फळ उत्कृष्ठ फळ आहे त्यात भरपूर पोषक अन्नद्रव्ये आहेत. याबाबतचे 2017 मध्ये भौगोलिक संकेतक प्रमाण निसर्गराजा कृषि विज्ञान केंद्र यांच्याकडे प्राप्त झालेले आहे. जळगावची केळी म्हणजे अतुल्य भारत व अमूल्य खजाना असा गौरव आहे.