जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. एकीकडे जळगावसह राज्यात उन्हाचा तडाखा वाढला असताना आता राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला. राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे पुढील तीन चार दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देखील जारी केला आहे. विशेष जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात ३० मार्च ते ३ एप्रिल पर्यंत अवकाळी पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज म्हणजे 31 मार्च 2025 रोजी पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि घाट माथ्यांवर हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे १ एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता आहे.
जळगाव जिल्ह्याला देखील पावसाचा अलर्ट
दरम्यान जळगाव जिल्ह्याला देखील अवकाळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे उद्या म्हणजेच १ आणि २ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. आज ३१ मार्च रोजी सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण दाटून आले होते. ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट होण्याची शक्यता आहे. रविवारी जळगावचे कमाल तापमान ३९.७ तर किमान तापमान २०.७ अंशांवर होते.