शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जळगाव जिल्ह्यात दमदार पावसाचा अंदाज, उकाड्यापासून मिळेल दिलासा

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली असून यामुळे सर्वच चिंतेत आहे. पावसाअभावी खरिपाची पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पाऊस कधी परतेल याकडे शेतकऱ्यांसह सर्वांचे डोळे ढगांकडे लागले आहे. मात्र अशातच पावसाची आस धरून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

उत्तर बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे तयार होत आहेत. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गुरूवारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्यामुळे पुढील ५ ते ७ दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात आज म्हणजेच ६ सप्टेंबर ते १० सप्टेंबरपर्यंत दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. जळगाव जिल्ह्यात जुलै महिना वगळता जून आणि ऑगस्ट महिने कोरडेच गेले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही देखील पाऊस झालेला नाहीय. पाण्याअभावी खरीप हंगामातील पिके करपून चालली असून बळीराजा संकटात सापडला आहे. सोबतच महिन्याभरापासून पाऊस नसल्याने तापमानात देखील वाढ झाली आहे.

पारा ३५ अंशावर पोहचल्यामुळे जळगावकरांना ऐन श्रावणात घामाच्या धारा लागल्या होत्या. मात्र, जिल्ह्यात ६ ते १० सप्टेंबरदरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसीत झाले असून, ६ सप्टेंबरनंतर हे क्षेत्र छत्तीसगड व विदर्भाकडे सरकणार आहे.

त्यामुळे पुन्हा पावसाची स्थिती निर्माण होणार असून, यामुळे अनेक – दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ११ ते १३ सप्टेंबरपर्यंत काही ताज्यांमध्ये किरकोळ पाऊस होऊ शकतो. मात्र, १४ सप्टेंबरनंतर पुन्हा काही दिवस पावसाचा खंड पडू शकतो. त्यानंतर पुन्हा जर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. तर गणेशोत्सव काळात पुन्हा पाऊस होऊ शकतो.