मंगळवार, सप्टेंबर 26, 2023

हवामान खात्याचा जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा : आगामी पाच दिवसाचा अंदाज वाचा..

जळगाव लाईव्ह न्यूज : 14 सप्टेंबर 2023 : पावसाबाबत हवामान खात्याने जळगाव जिल्ह्याला महत्वाचा अलर्ट जारी केला आहे. आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. आजपासून चार दिवसांसाठी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात मोठया खंडानंतर गेल्या आठवड्यात पाऊस परतला होता. त्यानंतर तीन ते चार दिवस जिल्ह्यात पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले. रविवारपासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा विश्रांती घेतलीय. मात्र आता आगामी चार ते पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे तीव्र क्षेत्रसोबत वादळी क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र ओडीशा, विदर्भमार्गे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. गुरुवारी मध्यप्रदेश व तापी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये या वादळी क्षेत्राचा मुख्य भाग राहणार असून, गुरुवारी दुपारनंतर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतीवृष्टी होऊ शकते. यासह जळगाव जिल्ह्यात ३० ते ४० किमी वेगाने देखील वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

आगामी पाच दिवसांचा हवामानाचा अंदाज असा?
१४ सप्टेंबर – जिल्ह्यातील एक-दोन तालुक्यात अतिवृष्टीची शक्यता, ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहणार
१५ सप्टेंबर- ठराविक भागात मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता
१६ सप्टेंबर – सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार तर अतीमुळसळधार पावसाची शक्यता
१७ सप्टेंबर – वादळी पावसासह, वीजांचा कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
१८ सप्टेंबर – काही भागात मध्यम ते काही भागांमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.