जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२५ । यंदा वेळेआधी दाखल झालेल्या मान्सून पावसाने सुरुवातीला महाराष्ट्रातील काही भागात जोरदार हजेरी लावली. जुलै महिन्यातही अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली; तर काही ठिकाणी अद्यापही म्हणावा तसा पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. आता आॅगस्टला सुरूवात झाली असून या महिन्यात पाऊस कसा राहणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. आगामी दोन महिन्याचा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे .

भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी माॅन्सून हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील पावसाचा अंदाज दिला. माॅन्सूच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. दोन्ही महिन्यांत सरासरीच्या १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. मात्र ऑगस्टच्या सुरुवातील राज्यात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अदांजातून दिसून येत आहे

कारण या ऑगस्ट महिन्यात सरासरी पावसाचा राहण्याचा अंदाज वर्तवला जात असला तरी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागात पाऊस कमी राहील राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे, तर तिसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरु होऊन चौथ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
देशातील पावसाची स्थिती ?
ऑगस्ट महिन्यात देशात हवामान विभागाने सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज दिला. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाना, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूत सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे.
महाराष्ट्रातील पावसाची स्थिती ?
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात राज्यात विदर्भ, मराठवाडा, पश्चिम मध्य महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टी भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. तर घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रात ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्यांत सरासरी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी राहणार आहे. अहिल्यानगर, नाशिक, ठाणे, पालघर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात मात्र सरासरी आणि सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला.











