जळगाव लाईव्ह न्यूज । ५ नोव्हेंबर २०२५ । दिवाळीपासून राज्यात धुमाकूळ घातलेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगामातील पिकांचं मोठं नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे. मागच्या दोन दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. दरम्यान राज्यातून आता पाऊस गेला असं वाटत असतानाच पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे रब्बी हंगामाची तयारी सुरू केलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. हवामान विभागानं दिलेल्या इशार्यानुसार पुढील तीन ते चार दिवस मराठवाडा, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील तापमान पुढील दोन ते तीन दिवस जैसे थे राहण्याची शक्यता आहे, त्यामध्ये कोणताही बदल होणार नाही, मात्र त्यानंतर हळुहळु तापमान कमी होऊन राज्यात गारठा वाढू शकतो. मात्र पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचं मोठं संकट असणार आहे. कोकणामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये तर मराठवाड्यात धाराशिव, लातूर या दोन जिल्ह्यांमध्ये तर पश्चि महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस पावसाची शक्यता आहे.
राज्यात थंडी केव्हा?
पुढील तीन ते चार दिवस राज्यातील तापमानात कोणताही बदल होण्याची शक्यता नाहीये, मात्र त्यानंतर हळुहळु तापमान कमी होऊन राज्यात गारठा वाढू शकतो असा अंदाज आहे. पुढील तीन ते चार दिवस तरी अजून राज्यावर पावसाचं संकट कायम आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रब्बी हंगामातील पेरणीला पावसामुळे विलंब होण्याची शक्यता आहे.











