पावसाच्या प्रतीक्षेत असताना IMD चा चिंताजनक इशारा; जळगावात पुढील दोन दिवस उष्णतेचा ‘यलो अलर्ट’

जून 16, 2026 9:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२६ । जून महिन्याचा अर्धा कालावधी संपला तरी जळगाव जिल्ह्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नाही. गेल्या दोन महिन्यांपासून कडक उन्हाच्या झळा आणि वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या जळगावकरांना पावसाची आतुरता लागली असतानाच हवामान विभागाने आणखी एक चिंताजनक इशारा दिला आहे. हवामान विभागाने आगामी दोन दिवस म्हणजेच १६ आणि १७ जून रोजी जिल्ह्यात उष्णता आणि प्रचंड उकाड्याचा ‘यलो अलर्ट’ (Yellow Alert) जारी केला आहे.

tapman

साधारणपणे जून महिन्याच्या मध्यावर हवामान विभागाकडून अतिवृष्टीचे अलर्ट दिले जातात. मात्र, यंदा ‘एल निनो’ प्रभावामुळे हवामान चक्रात मोठा बदल पाहायला मिळत आहे. परिणामी, ऐन पावसाळ्यात हवामान विभागाला उष्णतेचा आणि वाढत्या उकाड्याचा अलर्ट जारी करावा लागला आहे, जे यंदाच्या हंगामाचे वेगळेपण ठरत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार १६ आणि १७ जूनला जळगाव पारा ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. केवळ तापमानात वाढ होणार नाही, तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाणही ६० ते ७० टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः दुपारच्या वेळेत उष्माघाताचा धोका वाढू शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, उष्णतेचा प्रभाव कायम असला तरी वातावरणात काही प्रमाणात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांत जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन सायंकाळच्या सुमारास काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच दुपारनंतर वादळी वाऱ्यांसह पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

तज्ज्ञांच्या मते, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांमुळे राज्यातील काही भागांत मान्सूनच्या हालचालींना वेग मिळू शकतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही लवकरच मान्सूनसदृश वातावरण निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुढील पाच दिवसांचा अंदाज
दिनांक, तापमान, वातावरणाची स्थिती :

१६ जून : ४२ अंश, उष्ण व आर्द्रतायुक्त यलो अलर्ट, सायंकाळच्या वेळेस काही ठिकाणी पाऊस
१७ जून : ४२ अंश, उष्ण व आर्द्रतायुक्त यलो अलर्ट, सायंकाळच्या वेळेस काही ठिकाणी पाऊस
१८ जून : ४१ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण, सायंकाळी पावसाची शक्यता
१९ जून : ४० अंश, बहुतांश ढगाळ वातावरण
२० जून : ४० अंश, बहुतांश ढगाळ वातावरण

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now