पारोळ्यात धोकादायक रसायनांच्या अवैध साठवणुकीचा पर्दाफाश; लाखोंचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक

मे 13, 2026 11:10 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । पारोळा शहराजवळील म्हसवे शिवार परिसरात जळगाव पोलीस अधीक्षकांच्या पथकाने मोठी कारवाई करत धोकादायक रसायनांच्या अवैध साठवणुकीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी तब्बल ९ लाख ३२ हजार १२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका संशयित आरोपीला रंगेहाथ अटक केली आहे. दिनेश पोपटराव पाटील (वय ४३) असं अटक केलेल्या संशयिताचे नाव त्याच्यावर पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने परिसरात खळबळ उडाली आहे.

rasayank

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना गुप्त बातमीदाराकडून एक महत्त्वाची माहिती मिळाली होती. म्हसवे शिवारातील ‘रामदेव राजस्थानी चौधरी’ हॉटेलच्या पाठीमागे दिनेश पाटील हा इसम लोकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण होईल अशा अत्यंत धोकादायक पद्धतीने घातक रसायनांचा साठा करत होता. हे रसायन काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी आणले गेल्याचे समोर आले आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षकांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि अंमलदारांचे एक विशेष पथक तयार करून धाड टाकण्याचे आदेश दिले. ११ मे रोजी या पथकाने नियोजित ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी दिनेश पाटील हा मोठ्या साठ्यासह पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

या कारवाईत पोलिसांनी टाटा कंपनीचा १२ चाकी टँकर, अंदाजे ३८ हजार ७५० लिटर रसायनयुक्त पदार्थ, १५ हजार लिटर क्षमतेचा जमिनीवरील टँकर, मोटारसायकल, मोबाईल आणि रसायनांच्या टाक्या असा एकूण ९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संशयित आरोपी दिनेश पाटील याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश महाजन करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now