⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

स्कूलबसच्या धडकेत पती ठार, पत्नी गंभीर

जळगाव लाईव्ह न्यूज। २५ एप्रिल २०२२। शहरात सकाळच्या सुमारास फिरण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूलबस वरील चालकाने धडक दिल्याने एकाच जागीच मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी झाली आहे. सदर घटना दि २५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, सुप्रीम कॉलोनीतील रहिवासी गफ्फार पिंजारी वय ५४, हे पत्नी रईसाबी यांच्यासोबत दररोज राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर पहाटेच्या सुमारास फिरण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ६ वाजता गफ्फार पिंजारी व त्यांची पत्नी रईसाबी हे दोघे शतपावली करण्यासाठी निघाले. राष्ट्रीय महामार्गावरील नेक्सा शोरूम समोर पिंजारी दाम्पत्य पायी जात असतांना मागून (एमएच १९ डीवाय ९०३४) या क्रमांकाच्या टाटा मॅजीक स्कूलबसने जोरदार धडक दिली. या धडकेत गफ्फार पिंजारी हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी रईसाबी ह्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता गफ्फार पिंजारी यांना वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयताच्या पश्चात चार मुले, दोन मुली असा परिवार आहे. याप्रकरणी जाफर गफ्फार पिंजारी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.