गुन्हेमुक्ताईनगर

मुक्ताईनगरात भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत पती-पत्नी ठार, १ वर्षाचं बाळ थोडक्यात बचावले

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मे २०२६ । जळगाव जिल्ह्यात अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून अशातच मुक्ताईनगर तालुक्यातील बेलसवाडी फाट्याजवळ भरधाव ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांचे १ वर्षाचे निष्पाप बाळ या अपघातातून थोडक्यात बचावले असून ते जखमी झाले आहे.

गजानन हिरामण पाटील आणि त्यांची पत्नी अश्विनी गजानन पाटील (दोन्ही रा. कोचूर, ता. रावेर), अशी मृतांची नावे असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रावेर तालुक्यातील कोचूर गावचे रहिवासी गजानन पाटील हे पत्नी व आपल्या १ वर्षाच्या बाळासह दुचाकीने जात असताना बेलसवाडी फाट्याजवळ मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की, गजानन आणि अश्विनी पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेले १ वर्षाचे बाळ सुदैवाने या अपघातातून बचावले असले तरी ते जखमी झाले आहे.

अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी बाळाला आणि पाटील दांपत्याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. सध्या जखमी बालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी अपघात करणाऱ्या ट्रकवर दगडफेक करत काचा फोडल्या आणि आपला तीव्र संताप व्यक्त केला. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button