रविवार, डिसेंबर 10, 2023

राष्ट्रवादीसोबत चुल मांडायची कशी ? जिल्ह्यात शिंदे सेनेत धाकधूक !

जळगाव लाईव्ह न्यूज । 4 जून २०२३ ।  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रवादीकडून मतदारसंघातील कामांसाठी निधी मिळत नाही हे कारण पुढे करत ४० आमदारांनी बंडखोरी केली. यात जळगाव जिल्ह्यातील ५ आमदारांचा समावेश हाेता.मात्र आता एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत काम करावे लागणार आहे. यामुळे शिंदे सेनेच्या गोटात मात्र धाकधूक वाढली आहे.

विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडखोरीच्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. रविवारी त्यांनी समर्थक आमदारासह एकनाथ शिंदे व फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सत्तानाट्यानंतर राज्यासह जिल्ह्यातील शिंदे गटामध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

ठाकरे सरकारमध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नसल्याचा आरोप करीत एकनाथ शिंदे यांच्यासह आमदारांनी बंडखोरी केली होती. मात्र आता अजित पवार हे भाजप व शिंदे सरकारसोबत येऊन उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आता शिंदे गटातील आमदारांची मात्र अडचण झाली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व एकनाथ शिंदे यांची शिवसेना अशा दोन गटांत विभागली गेल्याने राजकीय समीकरणे बदली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फुट पडल्यानंतर विधानसभा व लोकसभा मतदारसंघाती समीकरणे बदलली आहेत. या घटना घडामोडीमुळे कार्यकर्ते विभागले जाणार आहेत.

आधीच खोके, गद्दार या शब्दांमुळे अडचणीत असलेल्या शिंदे गटातील आमदारांना आता राष्ट्रवादीसह सरकारमध्ये सहभागी होत असताना अडचण होणार आहे.शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यात ठाकरे गटाकडे संघटन राहिले मात्र शिंदे गटाकडील आमदार शिंदे गटाकडे राहिले. यामुळे शिदे गटाकडून कार्यकर्त्यांच्या संघटनावर भर दिला जात होता. त्यातच आता राष्ट्रवादीच्या सत्तासहभागानंतर मतदार संघात शिंदे गटाच्या आमदारांची डोकेदुखी वाढणार आहे.