⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

जि.प.शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा, १ लाखांचे ब्रेसलेट केले परत

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२१ । पाचोरा तालुक्यातील बनोटी येथे कामानिमित्त आलेले असताना मिलिंद देव यांचे १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट हातातून पडले होते. गावातीलच एका होतकरू तरुणाला ते ब्रेसलेट सापडले असता त्याने ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले होते. महिन्याभराने देव यांना त्याबाबत कळताच त्यांनी लागलीच संपर्क केला आणि आपले ब्रेसलेट त्यांना परत मिळाले. महेश खैरनार या तरुणाने दाखविलेल्या प्रामाणिकपणामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सोयगाव तालुक्यातील वडगाव येथील केंद्रप्रमुख उमेश महालपुरे  यांचे साडू व पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा येथील कापड दुकानदार मिलींद दत्तात्रय देव हे दि.७ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त बनोटी येथे आले होते. त्यावेळी त्यांच्या हातात असलेले २२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट (साधारण किंमत १ लाख १० हजार रुपये) हातातून बनोटी येथे गळून पडले होते. बरीच शोधाशोध केली तरी ते ब्रेसलेट मिळून आले नाही शेवटी ते परत मिळणार नाही असे वाटल्याने देव हे विसरून गेले.

मागील आठवड्यात बनोटी येथील शालीक भिकन खैरनार यांचे यांचा मुलगा महेश शालीक खैरनार ज्यांची बनोटी येथे रक्त तपासणीची लॅब आहे. ते वन विभाग कार्यालयासमोर जात असताना त्यांना ब्रेसलेट सापडले असता त्यांनी गावात मला २२ ग्रॅम सोन्याची वस्तू सापडली असून ओळख पटवून घेऊन जा असे सगळीकडे सांगितले. शुक्रवारी उमेश महालपुरे यांना सदर गोष्ट माहीत झाली. महेश हा त्यांचाच विद्यार्थी असल्याने त्याने लगेच घरी जाऊन वडिलांशी बोलणे करून दिले व तुमचे ब्रेसलेट घेऊन जा असे सांगितले. शनिवारी ते ब्रेसलेट परत देण्यात आले.

महेश व त्याचे वडील शालिक खैरनार यांचा सागर कृषी सेवा केंद्र बनोटी येथे देव यांनी ११ हजार १११ रुपये देऊन सत्कार केला. यावेळी बनोटी गावचे प्रथम नागरिक मुरलीधर वेहळे, माजी सरपंच सागर पाटील, मुखेड येथील शरद पवार, पत्रकार विकास सोनवणे, राजेंद्र पाटील, डॉ.रावसाहेब पाटील, डॉ.अजित पाटील, ज्ञानेश्वर सोनार, रमेश चौधरी, बापू कोळी, सोमनाथ तायगव्हान, मनोज पाटील, अमोल चिकटे व मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शाळेच्या माजी विद्यार्थ्याच्या व पालकांच्या प्रमाणिकपणाबद्दल शिक्षण विभागातर्फे गोंदेगावचे केंद्रप्रमुख सचिन पाटील, बनोटी केंद्राचे केंद्रप्रमुख नितीन राजपूत, वडगावचे केंद्रप्रमुख उमेश महालपुरे, बनोटीचे केंद्रीय मु.अधिकारी विकास पवार, संदीप सोनवणे यांनी महेश याचा सत्कार केला
महेश यांच्याबद्दल सांगायचे झाले तर.. सध्याच्या परिस्थितीत त्याला शेतात पाण्याची बोरिंग करणेसाठी १ लाख रुपयांची तातडीने गरज होती तरी त्याने व त्याच्या वडिलांनी दाखवलेल्या प्रामाणिकपनाबद्दल महेशचे व वडील शालीक खैरनार यांच्या परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे