जळगाव लाईव्ह न्यूज । आज ६ एप्रिल रोजी श्रीराम नवमीचा दिवस आहे. आज देशभरात श्रीराम नवमीचा उत्सव साजरा होतो. दरम्यान, जळगाव शहरात प्रभू श्रीरामांचे एक ऐतिहासिक मंदिर असून या मंदिराचा जीर्णोद्धार १८६७ साली करण्यात आला. एका आख्यायिकानुसार, अयोध्येहून वनवासासाठी निघालेल्या प्रभू श्रीरामांनी काही काळ यास्थळी विश्रांती घेतली होती. त्याच पवित्र स्थळी हे भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात आले आहे.

या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी जळगावातील रामभक्त व इनामदार श्री भोईटे यांनी मदत केली होती. या कार्याची जबाबदारी आप्पा महाराजांवर सोपविण्यात आली. त्यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार मंदिरात अनेक रूढी आणि धार्मिक परंपरा प्रस्थापित केल्या.
मंदिराची रचना नागरशैलीत करण्यात आली आहे. संपूर्ण सभा मंडप सागवानी लाकडातून बनवलेला असून त्यावर नाजूक कोरीव वेलबुटी आहे. जयपूरहून बोलावण्यात आलेल्या कुशल कारागिरांकडून संगमरवरी तळ व चौथरा तयार करण्यात आला आहे. मूळ गाभाऱ्यातील सिंहासन आणि दरवाज्यांवर चांदीचे पत्रे आहेत, तर मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस विराजमान आहे.
१५० वर्षांची रथोत्सव परंपरा
या मंदिरात १८७२ साली सुरू झालेला श्रीराम रथोत्सव हा आजही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. कार्तिक शुद्ध प्रतिपदा ते कार्तिक शुद्ध एकादशी दरम्यान हा उत्सव पार पडतो. प्रभू श्रीरामांची रथयात्रा कार्तिक प्रबोधिनी एकादशीला निघते. पहाटे ४ वाजता काकड आरती व महाअभिषेक, तसेच रात्री १२ वाजता रथ परत मंदिरात आणून उत्सवाची सांगता होते.
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक
या रथयात्रेचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे लालशाहबाबा समाधी येथे मुस्लिम समाजबांधवांकडून चादर चढवून रथाचे स्वागत केले जाते. त्यामुळे हा रथोत्सव हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो.
श्रीराम मंदिराची भक्ती परंपरा
आप्पा महाराजांनी मंदिरात नित्य त्रिफळ पूजा, दुपारी हरिपाठ, रात्री पुराणभजन यांचा नित्यक्रम सुरू केला. चातुर्मासात अखंड नामस्मरण, वीणा वादन, श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन होते. आप्पाजी महाराजांपासून सुरू झालेली परंपरा वासुदेव महाराज, केशवराव महाराज, बाळकृष्ण महाराज यांच्याकडून विद्यमान मठाधिपती मंगेश महाराज आणि त्यांच्या पुढील पिढीकडे चालत आली आहे.
रामानुज संप्रदायातील सन्मान
१८७१ साली आप्पाजी महाराज नाशिक क्षेत्री जात असताना, अयोध्येतील श्री रामानंद सरस्वती यांची सेवा केली. त्याबदल्यात त्यांनी प्रभू श्रीरामाची पंचायतन मूर्ती भेट दिली. १८७२ मध्ये वटपौर्णिमेस ही मूर्ती आणि श्री संत मुक्ताबाई यांच्या पादुका घेऊन पंढरपूर यात्रा श्रीराम मंदिरातून सुरू करण्यात आली.