जळगाव लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२१ । जळगाव मनपात करेक्ट कार्यक्रम करून शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक गळाला लावले होते. अपात्रतेप्रकरणी भाजपच्या २९ नगरसेवकांना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नोटीस बजावली आहे. त्यांच्या पात्रतेबाबत येत्या ११ जानेवारी रोजी नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, कोणते नगरसेवक पात्र ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
जळगाव महापालिकेत भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेच्या जयश्री महाजन या महापौर तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली. शिवसेनेचा हा विजय जळगावमधील गिरीश महाजन यांच्या वर्चस्वाला धक्का मानला गेला. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांचे जळगाव महानगरपालिकेवर वर्चस्व आहे. मात्र, असे असताना देखील शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाली आहे. मात्र, खरे नाट्य इथून पुढेच घडले आहे.
जळगाव महापालिकेतील महापौर, उपममहापौर निवडीवेळी भाजपच्या फुटलेल्या नगरसेवकांनी आपला स्वतंत्र ग्रुप स्थापन केला. त्यांनी बैठक घेऊन भाजपचे गटनेते, उपगटनेते यांची हकालपट्टी केली आणि नवीन पदाधिकारी नियुक्त केले. त्यात दिलीप पोकळे यांना गटनेते म्हणून नियुक्त केले. शिवाय प्रभाग समिती सभापती निवडीत त्यांनी आपलाच पक्ष भाजप असून, आपण दिलेल्या उमेदवारास मतदान करावे, असा व्हीप भाजप नगरसेवकांना बजावला. मात्र, भाजप नगरसेवकांनी तो व्हीप स्वीकारला नाही. त्यामुळे दिलीप पोकळे यांनी 2 ऑगस्ट 2021 रोजी नगरसेवक सीमा भोळे यांच्यासह 29 नगरसेवकांना अपात्र करावे, अशी तक्रार पक्षाचे गटनेते म्हणून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली. या तक्रारीची दखल घेऊन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भाजपच्या 29 नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणी 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नाशिकमध्ये सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय होणार, भाजपचे नगरसेवक पात्र ठरणार की अपात्र आणि कोणत्या नगरसेवकांचा पक्ष भाजप ठरणार हे पाहणे मोठे रंजक असणार आहे.
हे देखील वाचा :