⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव सिव्हीलमध्ये होणार मोठ्या आरोग्य तपासण्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया

जळगाव सिव्हीलमध्ये होणार मोठ्या आरोग्य तपासण्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिव्हील हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय झाले हायटेक; ना.गुलाबराव पाटील यांच्या माध्यमातून ५० कोटींचा निधी

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नातून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा सर्वसामान्य रुग्णालय हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक हायटेक हॉस्पिटल ठरले आहे. या रुग्णालयातील नव्या मोड्युलर आय. सी. यु. आणि मोड्युलर ऑपरेशन थिएटरमध्ये मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये होत असलेल्या आरोग्य तपासण्या व मोठ्या शस्त्रक्रिया आता जळगाव जिल्ह्यातच होणार आहे. याचा फायदा जिल्ह्यातील लाखों गरजू रुग्णांना होणार आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारामुळे गेल्या वर्षभरात दोन्ही रुग्णालयाच्या अत्याधुनिकरणासाठी 50 कोटी पेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजन मधून मंजूर करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त डीपीडीसीच्या माध्यमातून 15 कोटीचे अत्याधुनिक सिटी स्कॅन लवकरच उपलब्ध करणार असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.

अत्याधुनिक आयसीयू
अतिदक्षता विभागात सतत माहिती देणारे १४ मल्टिपॅरा मॉनिटर आहेत. सदर मॉनिटर हे नर्सिंग स्टेशनच्या संगणक प्रणालीस वायरलेस पध्दतीने जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची शारिरीक स्थितीबाबतची माहिती सतत अद्यावत होत असते.

सी आर्म मशिन विथ एफपीडी
अस्थिव्यंगोपचार विभागामध्ये “सी आर मशीन विथ फ्लॅट पॅनल डिटेक्टर” हे एक प्रगत वैद्यकीय इमेजिंग उपकरण उपलब्ध झाले आहे. यामुळे रुग्णांच्या हाडांवरती शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे. कमीतकमी रक्तस्त्राव व कमीतकमी टाक्यांमध्ये शस्त्रक्रिया करणं शक्य होत आहे. सांध्यांच्या क्लिष्ट शस्त्रक्रिया या मशीनद्वारे कमी वेळामध्ये करणे शक्य होत आहे. अस्थिव्यंगोपचारशास्त्र मधील क्लिष्ट शस्त्रक्रिया, वेदना व्यवस्थापन (अनेस्थेटिक्स) आणि आपत्कालीन प्रक्रियेदरम्यान या सी-आर्म मशीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे.

नाकाच्या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे
मायक्रो डिब्रायडर व कॅमेरा हे इम्पोर्टेड मशीन जागतिक दर्जाची ‘कार्ल स्टोर्ज’या आंतरराष्ट्रीय कंपनीचे असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव ही महाराष्ट्रातील पहिलीच व एकमेव संस्था आहे जेथे या मशीनचे प्रस्थापन करण्यात आलेले आहे. या उपकरणाद्वारे नाकाच्या सर्व शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येणे आता आपल्या महाविद्यालय व रुगणालयात शक्य होणार आहे. या दुर्बिणीद्वारे नासूर, नाकाच्या बुरशीचे (म्युकरमायकोसीस), नाकाचे ऍलर्जीमुळे बनलेले मस तसेच इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया या यशस्वीरित्या करता येतात.

कॉन्क्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया उपलब्ध
आंतरराष्ट्रीय जर्मनीच्या कंपनीच्या अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त सर्वोत्तम प्रतिचा एक्सटेरो हा ऑपरेटिंग मायक्रोस्कोप शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे प्रस्थापित करण्यात आलेला आहे. कानाच्या पडद्याला छिद्र असणे किंवा कानातील हाड सडले असल्यास त्याचा रुग्णाच्या जिवीतास धोका निर्माण होतो. तो दूर करण्यासाठी या ऑपरेटिंग मायक्रोस्कोपच्या सहाय्याने आवश्यक ती शस्त्रक्रिया करण्यात येऊन रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी मदत होते. ज्या मुलांना जन्मतः ऐकु येत नाही व त्यांना बोलताही येत नाही, यावर कॉन्क्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येणे आता शक्य होणार आहे.

रक्तचाचण्या होणार सुलभ
स्वयंचलित विश्लेषक हे नवीन यंत्र जीवरसायनशास्त्र विभागात आले आहे. सदर यंत्रावर रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या/तपासण्या करण्यात येतात. त्यामध्ये ब्लड शुगर, युरिया क्रिटिन यासह विविध नवीन व इतर प्रकारच्या अनेक चाचण्या या यंत्राद्वारे करण्यात येतात. या यंत्राची जवळपास प्रतितास १ हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे.

भूलशास्त्र विभागाला मॉनिटर
येथील बधिरीकरण शास्त्र विभागाला मल्टिपरा मॉनिटरद्वारे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करतांना रुग्णांना भूल द्यावी लागते. या अत्याधुनिक यंत्राचा उपयोग रुग्णास भूल देणे व रुग्णाचे मॉनिटरिंग करण्याकरिता होतो.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.