जळगाव पोलिसांच्या श्वान पथकात ‘गुरू’ची एन्ट्री; बॉम्ब शोधक म्हणून मिळाले विशेष प्रशिक्षण

ऑगस्ट 17, 2026 6:17 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलीस दलाच्या श्वान पथकात आता ‘गुरू’ या बॉम्ब शोधक श्वानाचा समावेश करण्यात आला आहे. बेल्जियन मालिनॉइस जातीच्या गुरूने पुणे येथील श्वान प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले असून, १५ ऑगस्ट रोजी त्याने जळगाव श्वान पथकात सेवा बजावण्यास सुरुवात केली.

guru

‘गुरू’चे वय सध्या एक वर्ष असून, त्याला विशेषतः स्फोटके आणि बॉम्ब शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्याने उत्तम कामगिरी करत ४०० पैकी ३७० गुण मिळविले आहेत.

दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह गुरूचे प्रशिक्षण

गुरूसोबत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप परदेशी (HC/534) आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश झोपे (HC/1926) यांनीही पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात सहा महिन्यांचे बेसिक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे आता हे दोन्ही कर्मचारी गुरूचे प्रशिक्षित हँडलर म्हणून त्याच्यासोबत काम करणार आहेत.

महत्त्वाच्या ठिकाणी गुरूची सेवा

जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणे, मोठे कार्यक्रम, गर्दीची ठिकाणे तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या दौऱ्यांच्या वेळी सुरक्षा तपासणीसाठी गुरूची मदत घेतली जाणार आहे. संशयास्पद वस्तू आढळल्यास त्याची तपासणी करण्यासाठीही गुरूच्या विशेष प्रशिक्षणाचा उपयोग होणार आहे.गुरूच्या समावेशामुळे जळगाव पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक पथकाची क्षमता आणखी वाढली असून, संभाव्य धोके वेळीच ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास पोलिसांना मदत मिळणार आहे.

सहा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून गुरू आणि त्याचे हँडलर्स जळगावात दाखल झाल्याने जिल्ह्याच्या सुरक्षा व्यवस्थेला आणखी एक सक्षम घटक मिळाला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now