जळगाव लाईव्ह न्यूज | जळगाव शहरात घरफोडीचे सत्र सुरूच असून अशातच शहरातील अयोध्या नगर परिसरातील लक्ष्मीनारायण नगरात मध्यरात्री घरफोडी झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अयोध्या नगरातील लक्ष्मीनारायण नगरात जिल्हा परिषदेचे कर्मचारी दीपक वराडे हे हे त्यांच्या मूळ गाव असलेलं गाडेगाव (ता. जामनेर) येथे एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घराचा कडी-कोयंडा तोडला आणि घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातील कपाटाची झडती घेत त्यातील दीड ते दोन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. सोमवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी शेजाऱ्यांच्या लक्षात घराचा दरवाजा उघडा असल्याचे आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.












