गुलाबराव पाटील संजय राऊतांवर संतापले; वाचा काय म्हणाले

जळगाव लाईव्ह न्यूज : १ मार्च २०२३ : खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केल्यानं सत्ताधार्‍यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. यानंतर संजय राऊतांवरील हक्कभंगाबाबत चौकशी करुन दोन दिवसांत चौकशी करुन ८ मार्च रोजी निर्णय घेणार असल्याचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं आहे.

चोरमंडळावरुन मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील संजय राऊतांवर निशाणा साधला. या सभागृहाला चोर म्हणायचं….४१ चोरांची मतं घ्यायची आणि राज्यसभेमध्ये जायचं. या चोरांनी त्याला मतं दिली, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. मार्मिकमधूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आक्षेपार्ह चित्र काढतात. कोणालाही डिवचायचा संजय राऊतांनी ठेका घेतलाय का?, असा सवालही गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

आम्ही जनतेच्या मतांवर या सभागृहात निवडून आलोय. तुमच्यासारखे मागच्या दरवाजाने निवडून आलो नाहीय. शिवसेनेची यांनी तर वाट लावली आणि ते आता १६ आमदारांची देखील वाट लावणार आहेत. ज्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उल्लू बनवलं. ३५-३५ वर्षे तपस्या करणार्‍या लोकांना घरातून बाहेर काढलं. या माणसाने शिवसेनेचा सर्व सत्यानाश केला, तो माणूस आज आम्हाला चोर म्हणतोय. सभागृहाला चोर म्हणतोय. तुम्ही आमची मतं घेतलीय. तुम्हाला जर येवढी गणिमा राखायची असेल तर आता खासदारकीचा राजीनामा द्यावा, असं आव्हान देखील गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.