जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२४ । जळगाव ग्रामीणमधून महायुतीकडून शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली २४ ऑक्टोबर रोजी त्यांनी धरणगावात जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज रविवारी श्री क्षेत्र पद्मालय देवस्थान येथून नारळ वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे.
गणरायाची पावन भूमी पद्मालय येथून प्रचाराला सुरुवात केली असून महायुतीचे सरकार येऊ दे.. असे साकडे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गणरायाला घातले आहे. यावेळी ते म्हणाले की, मला वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, शेवटी याबाबत महायुतीचे पक्षश्रेष्ठी ठरवतील ते आम्हाला मान्य आहे. चांगली कामे केली असेल तर लोक मला निवडून देतील. नाही केली असेल तर जनतेचा निर्णय मला मान्य राहील.
मला शंभर टक्के विजयाची खात्री आहे; माझाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.