जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मार्च २०२२ । पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शिवसेना भाजपचे (Bjp) लव्ह मॅरेज होते, अशी आठवण उगाळली. शिवाय शिवसेना (Shiv Sena) पैलवान आहे आणि आम्हीही पैलवान आहोत. मुंबईचे घोडामैदान दूर नाही, असा इशाराही दिला. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्यावर इशारा…
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पाच राज्यांच्या निकालांमध्ये चार राज्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. त्यामुळे भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. मुंबई महानगरपालिकेत गेल्या पंचवार्षिकमध्ये युती न करता शिवसेनेने निवडणूक लढली. केंद्र आणि महाराष्ट्र वगळता देशात सर्वाधिक भाजपचे मुख्यमंत्री असतानाही मुंबईचा महापौर शिवसेनेचा होता. मुंबई महानगरपालिकेसाठी चंद्रकांत पाटलांनी तयारी करावी. तुम्हीही पैलवान आहात, आम्ही ही पैलावान आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.
शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मंत्री झालो..
गुलाबराव पाटील म्हणाले की, मुंबई ही मराठी माणसांची आणि शिवसेनेची आहे. शिवसेना आणि मुंबईचे नाते 1966 पासून आहे. मुंबईत शिवसेनाप्रमुख नसते, तर काय झाले असते, हे गुलाबराव पाटलांनी सांगण्यापेक्षा चंद्रकांत पाटलांना जास्त माहिती आहे. हे पाच वर्ष सोडले, तर पंचवीस वर्ष भाजप आणि शिवसेनेचे लव्ह मॅरेज होते, याची जाणही त्यांनी यावेळी करून दिली. पाटील म्हणाले की, मी एका शेतकरी कुटुंबातील आहे. आमदार होईल, असे स्वप्न बघितले नव्हते. कुटुंबातील कोणी साधे ग्रामपंचायत सदस्यही नव्हते. 1982 साली मी पानटपरी आणि व्हिडिओ चालक होतो. शिवसेनाप्रमुखांच्या आशीर्वादाने मंत्री पदापर्यंत पोहोचले, असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
पक्ष वेगळे असले तरी…
पाटील म्हणाले की, राजकारणी माणसाने चार लोकांशी नाते ठेवले पाहिजे. पहिले शेतकरी, दुसरे पोलीस, तिसरे व्यापारी आणि चौथे डॉक्टर. ही मतांची ब्लड बँक आहे. पोलिसाला फोन करून एक मोटरसायकल सोडल्यास दोन मते पक्की होतात. डॉक्टरांना फोन करून बिल कमी केले, तर दहा मते पक्की होतात. एक शेतकऱ्याची विजेची लाइन जोडून दिली, तर 50 मते मिळतात. व्यापाऱ्याला त्रास नाही दिला, तर पुड्या बांधता बांधता शंभर मते पक्की होतात. राजकारणी माणसाची सुरुवातीला वेगवेगळी परिस्थिती असते. वेगवेगळ्या विषयाच्या डॉक्टरप्रमाणे आमचे पक्ष वेगवेगळे असले, तरी ही माणसाची भावनाही कार्य करण्याची असल्याचा उल्लेख त्यांनी केला.