हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीची छापेमारी ; गुलाबराव पाटील म्हणतात..

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज ईडीचा छापा पडला. यावेळी कागल शहरात मोठ्या प्रमाणावर जमाव जमला होता.हसन मुश्रीफ यांच्याविरोधात होणारा ईडीची कारवाई ही सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केला. त्यावर आधी भाजपचे आमदार निलेश राणे यांनी उत्तर दिलं होतं. तसेच कशाला थयथयाट करता असा सवाल केला होता. त्यानंतर आता शिंदे गटाचे नेते, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील आपलं मत मांडलं आहे.

गुलाबराव पाटील यांनी, ईडी ही एक वेगळी एजन्सी असून ईडीचे वेगळे अधिकार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. दरम्यान अशी कुणावर कारवाई झाली असेल तर विरोधक केवळ यंत्रणांचा गैरवापर होतो असे उत्तर देतात.

दरम्यान हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर ते बिनधास्त बाहेर येतील. ज्यांनी काही केलं नाही ते देखील बाहेर आलेच. मात्र जामीन मिळण्यासाठी आत तर जावेच लागते असेही वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

राज्यात अनेक वाद उफाळून येत असतानाच आता ईडीचे भूत भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा उठवून बसवले आहे. सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार केली होती. त्याप्रमाणे आज मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापा टाकला.