⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

गुलाबराव पाटील साहेब नाथाभाऊंच्या पावलावर पाऊल नका ठेऊ!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहर विकासाच्या बाबतीत आजवर कायम मागासलेले राहिले आहे. शहर दुर्लक्षित राहिले म्हणण्याऐवजी दिग्गज राजकारण्यांच्या वादात शहर भकास झाले असे म्हणणे योग्य होईल. जळगाव मनपात आजवर सत्ता उपभोगत असलेल्या पक्षाच्या विरोधातील पक्ष राज्यात सत्तेत होता. एखादं दोन वेळेस समान संधी मिळाली देखील परंतु तो काळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पुरेसा नव्हता. जळगाव शहराच्या राजकारणातील दिग्गज नाव म्हणजे सुरेशदादा जैन. जळगाव शहर मनपावर वर्षानुवर्षे जैन गटाने सत्ता अबाधित राखली मात्र तेव्हा राज्यात मोठ्या पदावर एकनाथराव खडसे होते.

सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे यांच्यातील वैर जगजाहीर आहे. दोघांच्या वादात शहराला हवा तितका निधी मिळाला नाही किंबहुना निधी मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या. शहरासाठी वाघूरचे पाणी मिळाले पण त्याचे श्रेय कुणाचे? यावर खूपच वाद रंगला होता. तेव्हाचे राजकीय बलाबल जर लक्षात घेतले तर सुरेशदादा जैन आणि एकनाथराव खडसे दोन्ही नेते राज्यात मोठ्या पदावर होते. दोघांनी शहराच्या विकासाच्या दृष्टीने विचार केला असता तर आज चित्र प्रचंड सकारात्मक दिसले असते. खडसे आणि जैन यांचा मनपातील काळ गेला आणि महाजन, देवकर, पाटलांचा काळ आला.

पालकमंत्री असताना गुलाबराव देवकर, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, गुलाबराव पाटील यांनी डीपीडिसी आणि मंत्रालय स्तरावरून काही निधी शहराच्या पारड्यात टाकला पण त्यामागे कारण वेगळे होते. राज्यात सत्ता, मनपात अस्तित्व आणि जळगाव शहराशी जुळलेले संबंध निधी मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेला निधी कधीच्या कधी मिळाला खरा पण त्यात देखील अडचणी निर्माण झाल्या. महाजनांनी निधी दिला मात्र पक्षीय मतभेदमुळे तो आखर्चित राहिला. राज्याचे संकटमोचक म्हटल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांनी देखील शहरावरील संकट दूर करण्याचा विचार केला नाही.

जळगाव शहरात अनेक वर्ष सुरेशदादा जैन गटाची सत्ता असताना देखील शहराचा विकास झाला नसल्याचे खापर नेहमीच एकनाथराव खडसे आणि गिरीश महाजन यांच्यावर फोडले जात आहे. राज्यातील शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर जळगाव मनपात ठाकरे गटाच्या शिवसेनेचे वर्चस्व राहिले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे गटाचे असून त्यांनी शहरासाठी दिला जाणारा निधी रोखल्याचा आरोप होत आहे. गेल्या वर्षी मनपातील सत्ताधारी आणि पालकमंत्री एकाच गटाचे असल्याने डीपीडीसीतून त्यांनी भरगच्च निधी जळगाव मनपासाठी दिला होता. गेल्या सहा महिन्यातील परिस्थिती लक्षात घेता पालकमंत्र्यांनी जळगाव मनपाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

शहरासाठी नव्याने निधी तर मिळालाच नाही शिवाय विरोधक आरोप करीत असलेला निधी मिळण्याचा मार्ग देखील मोकळा झालेला नाही. महापौर जयश्री महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात थेट वाद उभा राहिला असून त्याचे उदाहरण नुकतेच जिल्हा दूध संघ निवडणुकीत देखील पाहायला मिळाले. गेल्या काही महिन्यांपासून महापौर सरळ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करीत असून शहराला निधी मिळत नसल्याचा आरोप करीत आहेत. शहरात मंजूर असलेल्या काही कामांमध्ये देखील त्रुटी काढण्यात येत असल्याने आणखी काही कामे रखडणार असल्याचे चित्र आहे. जर हे असंच सुरू राहीले तर आगामी वर्ष देखील जळगावकरांना धूळ आणि खड्ड्यांच्या त्रासात घालवावे लागेल.

जळगाव जिल्ह्यातील दोन दिग्गज नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजन हे राज्यात मोठ्या मंत्री पदावर आहेत. सत्तेत देखील त्यांचा मोठा वाटा असल्याने त्यांनी टाकलेला कोणताही शब्द खाली जाणार नाही अशी स्थिती आहे. शिवाय माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे देखील मोठ्या पदावर नसल्याने त्यांच्याकडून शहराच्या विकासकामात काही अडसर येईल असे दिसत नाही. इतकंच नव्हे तर माजी मंत्री सुरेशदादा जैन देखील जळगावात परतणार असल्याने त्यांच्याशी सल्लामसलत करून नेत्यांनी पुढील सहा महिन्यात शहराचा चेहरामोहरा बदलविणे आवश्यक आहे.