⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

..तर अशी वेळ आली नसती’, गुलाबरावांचा आदित्य ठाकरेंना टोला

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२२ । एकीकडे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगावात युवा सेनेला मोठा धक्का बसला आहे. युवा सेनेचे 80 पदाधिकारी आणि दोनशे युवा सैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. Gulabrao Patil criticizes Aditya Thackeray

शिवसेनेच्या शाखांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना फिरावे लागत आहे, यासारखे दुर्दैव नाही. आधीच दौरे केले असते, तर आज ही वेळ आली नसती, अशी टीका शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले, की मी आधीही म्हणालो होतो उद्धव साहेबांची प्रकृती ठीक नव्हती. पण आपण तर तीस वर्षांचे तरूण आहात. आपण राज्यभर दौरे केले असते तर आजा ही वेळ आली नसती. आज उद्धव ठाकरेंना शाखेवर जावे लागत आहे. विनामास्कचे जावे लागत आहे, ही वाईट परिस्थिती आहे. हेच जर आधी केले असते, तर आमची शिवसेना अधिक मजबूत झाली असती. बाळासाहेबांची शिवसेना मजबूत व्हावी, यासाठीच आम्ही हा उठाव केला आहे. शिवसेनेचे गतवैभव आम्ही प्राप्त करू, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

आदित्य ठाकरे सध्या नाशिकमध्ये आहेत. सकाळी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन त्यांनी घेतले. त्यानंतर ते मनमाड येथे आले. मनमाड येथे शिवसेनेच्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. यावेळी सुहास कांदे यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. तसेच हे बेकायदेशीर सरकार आहे. ते कोसळणारच. हे तात्पुरते सरकार आहे. बेकायदेशीर आहे. गद्दारांचे सरकार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.