जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२४ । राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशावर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे. दरम्यान यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्या पक्ष बदलाच्या निर्णयावर तीव्र भाषेत प्रतिक्रिया दिली आहे.
गुलाबराव देवकर यांना पक्ष बदलाची घाई झाली
“गुलाबराव देवकर यांना पक्ष बदलाची काय घाई झाली आहे? विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर लगेच आठ दिवसांमध्ये या माणसाला पळावे लागत आहे. कारण त्यांनी जिल्हा बँकेत घोटाळा केला आहे, मजूर फेडरेशनचा दहा कोटींचा विषय आहे, अटलांटा घोटाळा आहे आणि घरकुल घोटाळ्यात झालेली शिक्षा आहे”.
गुलाबराव देवकारांवर टीका
ते म्हणाले, “गुलाबराव देवकर यांनी जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, अटलांटा या घोटाळ्यांमध्ये अडकू नये, स्वतःच्या बचावासाठी कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही. मी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे”. गुलाबराव पाटील यांनी या प्रतिक्रियेतून गुलाबराव देवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत आणि त्यांच्या राजकीय निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.