गुलाबराव पाटलांनी बाप बदलला, शिवसेना कार्यकर्ते संतप्त, पुतळा जाळला
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जून २०२२ । शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सालदाराच्या मुलाला आमदार केले, आमदाराला मंत्री केले, कॅबिनेट मंत्री पद दिले. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेशी गद्दारी केली असून ज्यांना शिवसेनेने त्यांना मोठं केलं अशांनीच सत्तेसाठी बाप बदलला, अशी संतप्त प्रतिक्रिया धरणगावच्या शिवसैनिकांनी दिली आहे. दरम्यान, शिवसैनिकांनी भर चौकात या गुलाबराव पाटलांच्या पुतळ्याचे दहन देखीलही केले आहे.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले असून तब्बल ४६ आमदार घेऊन ते आसामच्या गुवाहाटी येथील हॉटेलात थांबले आहेत. शिंदे यांच्या बंडाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत परत या असे आवाहन केले. मात्र अजूनही शिंदेनी भूमिका स्पष्ट केली नसल्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेशी गद्दारी केली असल्याचे शिवसैनिकांना वाटत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात शिंदे गटा विरोधात शिवसैनिक निदर्शने करत आहे. तसेच आम्ही उद्धव ठाकरेंसोबत असल्याचे सांगत आहेत. धरणगाव येथे याचप्रकारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
संतप्त शिवसैनिक म्हणाले की, गुलाबराव पाटील पुन्हा धरणगाव आले तर त्यांना लाथेने तुडवू. गुलाबराव पाटलांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काहीही कमी पडू दिले नाही, तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांना धोका दिला आहे. गुलाबराव पाटील संकटात पक्षप्रमुखांना सोडून चालले गेले आहेत. त्यांच्या कृतीमुळे धरणगाव तालुक्यातील शिवसैनिक संतप्त आणि नाराज झाले आहे. अशी प्रतिक्रिया शिवसैनिकांनी दिली. तसेच यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.
एकनाथ शिंदे समर्थक गट जेव्हापासून महाराष्ट्रातून बाहेर गेला आहे. तेव्हापासून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसैनिक त्यांच्या विरोधात काही ना काही निदर्शने करत आहेत. शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे त्याशिवाय कोणाचीच नाही असे त्यांचे म्हणणे आहे. याच बरोबर भारतीय जनता पक्षाशी युती करणे हे चुकीचे आहे असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. आता हा शिवसेनेतला अंतर्गत संघर्ष कधी संपतो आणि पुढे काय होतं हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.