जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२५ । जळगावसह राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने भाजून काढणारे ऊन पडत आहे. उन्हाची तीव्रता वाढताच काही ठिकाणी पाणी टंचाईची भीषणता जाणविण्यास सुरवात झाली आहे. यातच जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये भूजल पाणी पातळीत घट झालीय. पाऊण ते सव्वा मीटरपर्यंतची घट झाल्याची माहिती असून यामुळे या तालुक्यांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पाणी पातळीत वाढ झाली होती. यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा भूजल पाणी पातळीतील घट कमी असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. तरी देखील जळगाव जिल्ह्यातील तापमान ४२ अंशाच्या वर गेले असल्याने प्रचंड उष्णता जाणवत आहे. याचा परिणाम पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात घट निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.
वरीष्ठ भूवैज्ञानिक विभागातर्फे मागील पाच वर्षाची पाणी पातळीची सरासरी लक्षात घेऊन जिल्ह्यातील १५ तालुक्याची पाणी पातळी मोजली जाते. तसेच जिल्ह्यातील विहीरींचेही निरीक्षण केले जाते. त्यानुसार जिल्ह्यातील भूजल पातळी निश्चीत केली जाते. गेल्या वर्षी १३० टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असले तरी यंदा एप्रिल महिन्यातच जिल्ह्यातील सहा तालुक्यांच्या पाणी पातळीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
या सहा तालुक्यातील भूजल पाणी पातळीत घट
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात अधिक पाण्याची समस्या पाहण्यास मिळते. यंदा मात्र जिल्ह्यातील चाळीसगाव, पारोळा, जामनेर, धरणगाव, एरंडोल, अमळनेर या सहा तालुक्यात ०.७७ ते १.११ मीटर मीटरपर्यंत भूजल पाणी पातळीत घट झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी काळात पाण्याचे स्रोत आटून पाणी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतर तालुक्यांमध्ये मात्र पाणी पातळीत अल्प स्वरूपात घट झाली आहे.