⁠ 
मंगळवार, एप्रिल 16, 2024

आजी-माजी कर्मचाऱ्यानेच मारला दुकानात डल्ला, सव्वा लाखांचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । येथील गांधी मार्केटमधील एका दुकानात काम करणाऱ्या दोन तरुणांनी बनावट चावी तयार करुन दुकानातून एक लाख २० हजार ६० रुपयांच्या मुद्देमालावर डल्ला मारला ही घटन दुकानमालकाच्या लक्षात येताच त्यांनी एकाला पकडले. तर दुसरा पळून जाण्यात यशस्वी ठरला.
अधिक असे कि, गोपाल काशिनाथ पलोड (वय ६५, रा. रिंगरोड परिसर) यांच्या दुकानात चोरी झाल्याचा प्रकार घडला. त्यांचे महात्मा गांधी मार्केटमध्ये भारत एजन्सी नावाचे दुकान आहे. या दुकानात ते पतंजलीचे उत्पादने विकतात. त्यांच्याकडे अनिल भिकमचंद राठी (रा. शाहूनगर) व समाधान धनगर (रा. आसोदा) हे कामावर होते. पाच एप्रिल रोजी नियमितपणे दुकान बंद करुन पलोड कुटुंबीय घरी गेले. यानंतर रात्री १०.४५ वाजता अनिल व समाधान यांनी बनावट चावीने दुकान उघडून त्यातील खाद्यपदार्थ एका मालवाहू रिक्षेत भरण्यास सुरूवात केली. यावेळी तेथुन जात असलेलेे पतंजलीचे स्थानिक अधिकारी इकबाल यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी पलोड यांच्या मुलास फोन करुन दुकान एवढा वेळ का सुरू आहे असा प्रश्न विचारला. मुलगा बाहेरगावी असल्याने त्याने वडीलांना फोन करुन विचारणा केली. वेळेत दुकान बंद केले असूनही आता पुन्हा उघडले कुणी? याचा तपास करण्यासाठी पलोड दाम्पत्य कारने दुकानाजवळ पोहाचेले. यावेळी समाधान याने विद्या पलोड यांना धक्का देऊन खाली पाडले व माल भरलेले वाहन घेऊन पळुन गेला. तर अनिल पलोड दाम्पत्याच्या हाती लागला. या प्रकरणी पलोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघ संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.