जळगावात भव्य राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा; हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी, 300 पोते साखरेच्या बुंदीचा महाप्रसाद

Chalisgaon News । जळगाव लाईव्ह न्यूज । तुषार देशमुख । जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या म्हणजेच श्री बाबाजींच्या 33 व्या पुण्यस्मरणार्थ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत श्री क्षेत्र गोंडगाव तालुका भडगाव येथे भव्य राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याचे दि.२८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजन केलेले आहे. कुंभमेळ्याप्रमाणे हा सोहळा महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी संपन्न होणार आहे. या सोहळ्यात अखंड नंदादीप, यज्ञजपानुष्ठान,एकनाथी भागवत, महिला जपानुष्ठान,हस्तलिखित जपसाधना, कीर्तन सप्ताह, आदी धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे.

राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्यामध्ये ३३ कुंडात्मक कार्यसिद्धी महायाग यज्ञाचे आयोजन केलेले आहे.या कार्यसिद्धी महायाग यज्ञासाठी बांबूच्या कांबड्या व बांबूच्या सुताच्या धाग्याने पाच ते सहा हजार स्क्वेअर फुटात भव्य यज्ञमंडप उभारण्यात आला आहे. कार्यसिद्धी महायज्ञासाठी लक्ष्मीनारायण जोडपे, कुमारीका मुली, अविवाहित तरुण, या सर्वांना सहभागी होता येणार आहे. या धर्मसोहळ्यात तब्बल ३०० साखरेच्या पोत्यांच्या बुंदीचा महाप्रसाद बनवण्यात येणार आहे. आठ दिवस अखंड अन्नदान सुरू असणार आहे. जळगाव जिल्ह्यात प्रथमच अशा भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

जळगाव व धुळे जिल्ह्यातील लाखो भावीक या सोहळ्यामध्ये आठ दिवस सहभागी होणार आहे. कुंभमेळ्याप्रमाणे चार जिल्ह्यांमध्ये राष्ट्रनिर्माण धर्म सोहळा एकाच वेळी संपन्न होणार असल्याने जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज हेलिकॉप्टरने चारही जिल्ह्यात चारही सोहळ्यांना एकाच दिवशी भेट देऊन कार्यक्रम ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. गोंडगाव येथील राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याच्या मुख्य कमिटीचे अध्यक्ष डॉ.गणेश अहिरे व उपाध्यक्ष माजी सैनिक समाधान पाटील हे आहेत. नाशिक, जळगाव, संभाजीनगर, अहमदनगर या चार जिल्ह्यांमध्ये हा सोहळा एकाच वेळी संपन्न होणार आहे.