जळगाव लाईव्ह न्यूज । २४ नोव्हेंबर २०२१ । कामात हलगर्जीपणा करणे एका ग्रामसेवकाला चांगलाच भोवला आहे. अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामविकास अधिकारी कैलास देसले यांना कामात दिरंगाई केल्याबद्दल पंचायत समितीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश बीडीओ एकनाथ चौधरी यांनी २२ रोजी काढले. विशेष म्हणजे देसले यांना देवगाव देवळीत कार्यरत असताना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाला होता.
सध्या जानवे येथील ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत कैलास देसले यांनी देवगाव देवळी येथे ग्रामसेवक असताना २००३ ते २००५ तसेच २००९ ते २०१४ या कालावधीत मासिक सभा व ग्रामसभा कोरम पूर्ण नसताना घेणे, सभा तहकूब न करता इतिवृत्त नोंदवहीत लिहिणे, मासिक सभेत सदस्यांच्या स्वाक्षऱ्या न घेताच इतिवृत्त लिहिणे, ग्रामपंचायतीच्या विविध योजनांच्या वार्षिक जमा खर्चास मंजुरी न घेणे आदी गंभीर अनियमितता केल्याचे आढळले.
त्यामुळे जिल्हा परिषद सेवा (वर्तणूक) नियम १९६७ व नियम १९६४ नुसार प्रशासकीय कारवाई करून पंचायत समिती सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देवगाव देवळीत कार्यरत असताना ते आदर्श ग्रामसेवक ठरले होते.