‘पिंक आटो’ शुल्क शासनाने माफ करावे – मनसे

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२३ । राज्यात अबोली रिक्षाच्या (पिंक आटो) माध्यमातून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सज्ज होताय. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने विविध प्रकारचे वाहन शुल्क माफ करावे व महिला सक्षमीकरणात योगदान द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी केली आहे.

यासंदर्भात श्री. देशपांडे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना ई- मेलद्वारे निवेदन सादर केले. नवीन अबोली रिक्षा घेऊन प्रवासी रिक्षा वाहतूक या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात येत आहे. महिलांना नवीन रिक्षा घेण्यासाठी राज्यातील अनेक सामाजिक संस्था मदत करीत असून,

राज्यातील सहकारी बँका व राष्ट्रीयकृत बँका अर्थसहाय्यही करीत आहेत. महिलांचाही याकडे कल वाढत आहे. प्रवासी रिक्षा व्यवसाय करताना महिला सुरक्षित प्रवासी वाहतूक करून चांगले उत्पन्न मिळवीत आहेत. रिक्षा घेण्यासाठी बँकेकडून ८५ टक्के अर्थसहाय्य करण्यात येते. मात्र, आगाऊ १५ टक्के रक्कम जमवणे, अशा महिलांना जिकरीचे होते. त्यातच कच्चा परवाना, पक्का परवाना, वाहनकर असा साधारण २० हजार रुपये वेगळा खर्च येतो.

अशा महिलांना प्रोत्साहन म्हणून नोंदणी शुल्क, वाहनकर शुल्क, कच्चा परवाना शुल्क, पक्का परवाना शुल्क शासनाने माफ करावा. जेणेकरून महिला सक्षमीकरणाचे खरे कार्य राज्यात उभे राहील.