जळगाव लाईव्ह न्यूज । २१ नोव्हेंबर २०२२ । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी एरंडोल येथे मराठा क्रांती मोर्चा, मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, सकल मराठा समाज व समविचारी सामाजिक संघटनांतर्फे हायवे चौफुलीवर कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमांना ” जोडा मारो “आंदोलन करण्यात आले. यावेळी कोश्यारी व त्रिवेदी यांच्या विरोधात घोषणा देऊन त्यांचा तीव्र निषेध करण्यात आला.
याप्रकरणी कोश्यारी व त्रिवेदी यांच्या बद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला जवळपास ३० मिनिटे हे आंदोलन करण्यात आले त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अश्या व्यक्तींना पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांची हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी तहसीलदार व पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉलेज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांनी केले. या आंदोलनात प्रा. मनोज पाटील, डॉ. राजेंद्र देसले, अभिजीत पाटील, डॉ. सुरेश पाटील, प्रशांत पाटील, संभाजी पाटील, के. डी. पाटील, प्रा. आर. एस. पाटील, सदानंद पाटील, रोहिदास पाटील, जगदीश पाटील, डी. एस. पाटील, राजेंद्र शिंदे, राजेंद्र चौधरी, अजय पाटील, प्रमोद पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.