जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२५ । एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांनी १३ ऑक्टोबरपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनचा पवित्रा घेतला असतानाच आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. ती म्हणजे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी सरकारकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय सणाच्या पार्श्वभूमीवर ‘उत्सव अग्रीम उचल’ देण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी काहिशी सुसह्य होणार आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान होतो. परंतु, अनेकदा वेळेत वेतन मिळत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होते. यंदा दिपावली सण दि.२१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. दिवाळीला १० दिवस बाकी असल्याने, दिवाळीच्या खरेदीवर विरजण पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.

परंतु, राज्य सरकारच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबरचा पगार वेळेत व्हावा यासाठी ४७१.०५ कोटीचा निधी देण्यास गृहविभागाने मंजूरी दिली आहे. एसटी महामंडळाने या संदर्भात एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे सप्टेंबरचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला असून एसटीच्या ८३ हजार कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरचे वेतन मिळणार आहे.
तसेच ऊत्सव अग्रीम उचल देण्याचाही निर्णय घेतलाय. त्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांची रु. १२,५००/- उत्सव अग्रीम घेण्याची इच्छा आहे त्यांनी त्यांचे विभाग नियंत्रकांकडे अर्ज जमा करावेत. त्या अर्जाची तपासणी करुन पात्र कर्मचाऱ्यांची यादी १५ ऑक्टोबर २०२५ पर्यन्त या कार्यालयास पाठवावी असे आदेश देण्यात आले आहेत.
वेतन मर्यादा काय ?
उत्सव अग्रीम मिळण्यासाठी कमाल मूळ वेतन मर्यादा रु.४३४७७/- इतकी ठेवण्यात आली आहे. याचा अर्थ ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन रु. ४३४७७/- पेक्षा जास्त आहे अशा कर्मचाऱ्यांना उत्सव अग्रीम मिळणार नाही असेही महामंडळाने स्पष्ट केले आहे. शिवाय ज्या कर्मचाऱ्यांची सेवानिवत्ती अग्रीम वाटपापासून १० महिन्यांच्या आत असेल अशा कर्मचाऱ्यांनी उत्सव अग्रीम अर्जाचा विचार करु नये असेही या पत्रकात म्हटले आहे. अग्रीम वाटपाकरीता आपल्या घटकास किती रक्कम लागणार आहे याची माहिती दि. १५ ऑक्टोबर २०२५ पर्यंत विभागिय लेखा अधिकारी राज्य परिवहनाला कळवावी असे या पत्रकात म्हटले आहे.












