⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी ‘गुड न्यूज’, जाणून घ्या बातमी काय सांगते!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२२ । एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून २३२ कोटी रुपयांची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे अंजनी धरणातील जलसाठ्याचे पाणी लाभ क्षेत्रातील शेत जमिनीपर्यंत मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे, खऱ्या अर्थाने हरितक्रांती होऊन सुख-समृद्धीचे सोनेरी पहाट शेतकऱ्यांच्या आयुष्यात उजळणार आहे. यासाठी चिमणराव पाटील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला होता, अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले आहे.

एरंडोल तालुक्यातील पळासदळ गावा जवळ अंजनी नदीवर हा प्रकल्प हाउभारण्यात आला आहे. या प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यामुळे प्रकल्पाची सिंचनक क्षमता पूर्ण होईल तसेच प्रकल्पाखालील तालुक्यातील २०६८ हेक्टर व धरणगाव तालुक्यातील ७६२ हेक्टर असे एकूण २८३१ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे क्षेत्र संपादन करण्याची गरज नाही व शेतकऱ्यांची शेती देखील वाया जाणार नाही असा दुहेरी फायदा होणार आहे.

सदर प्रकल्पाचे काम २००८ साली पूर्ण झाले असून प्रकल्पामध्ये पाणीसाठा होत होता. वितरण प्रणाली अभावी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ मिळत नव्हता व प्रकल्पात पाणीसाठा पडून होता. आ. चिमणराव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून सदर प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घेतल्यामुळे संपूर्ण एरंडोल व धरणगाव तालुक्यातील सिंचनाचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील यांचे मनापासून आभार मानले व त्यांना धन्यवाद दिले.

साधारण सात आठ दिवसानंतर पद्मालय साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेचा प्रस्तावासही मंजुरी मिळणार असून सदर प्रकल्पाचे काम हे मार्गी लागणार आहे. त्याबाबतचा देखील आ. चिमणराव पाटील हे सातत्याने पाठपुरावा करीत असून लवकरच पद्मालय साठवण तलाव व उपसा सिंचन योजनेच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळेल असे सांगण्यात आले.